Nitish Kumar, Chirag Paswan Sarkarnama
देश

Chirag Paswan : चिराग पासवान यांना रोखण्यासाठी भाजपचे ‘पारस’ अस्त्र? नितीश कुमारांनाही भेदणार...

Rajanand More

New Delhi : लोकसभा निवडणुकीत 100 टक्के स्ट्राईक रेटने पाच उमेदवार निवडून आणत चिराग पासवान यांनी आपली ताकद दाखवून दिली. त्यांना मिळालेले भाजपचे बळही त्यासाठी कारणीभूत ठरले. पण आता हेच चिराग उघडपणे केंद्र सरकारच्या काही धोरणांवर टीका करताना दिसत आहे. ते एनडीए सरकारची डोकेदुखी ठरत असल्याचीही चर्चा आहे.

चिराग हे मोदी सरकारमध्ये मंत्री आहेत. त्यामुळे सरकारविरोधात उघडपणे भूमिका घेतल्याने एनडीएमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा रंगत आहे. चिराग यांनी भारत बंदला जाहीर पाठिंबा दिला. यूपीएससीची परीक्षेविना भरती असो की वक्फ विधेयक, त्यांनी सरकारविरोधी भूमिका घेतली. दोन्ही ठिकाणी सरकारला माघार घ्यावी लागली.

पाच खासदारांच्या ताकदीवर चिराग यांच्याकडून सुरू असलेल्या या विरोधकधार्जिणी भूमिकेवर नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच भाजपकडून त्यांचे काका पशुपती पारस यांची ताकद वाढवणार असल्याचे राजकीय विश्लेषकांकडून सांगितले जात आहे. पारस यांना राज्यपाल किंवा एखाद्या केंद्रीय आय़ोगाचे अध्यक्षपद दिले जाऊ शकते.

पशुपती पारस यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपच्या नेत्यांना भेटले होते. या भेटीत त्यांना मिळणाऱ्या राजकीय गिफ्टची चर्चा झाली असावी, अशी चर्चा आहे. रामविलास पासवान यांच्या निधनानंतर पक्षात फुट पडली आणि चिराग आणि पशुपती पारस एकमेकांविरोधात उभे ठाकले. भाजपने पारस यांना केंद्रीय मंत्रीही केले होते. पण या लोकसभा निवडणुकीत भाजप चिराग यांच्या मागे उभे राहिले. आता पुन्हा पारस यांना ताकद दिली जाणार असल्याचे समजते.

चिराग यांच्या काही निर्णयांवरील विरोधी भूमिकेमुळे भाजपकडून पारस यांच्या खांद्यावरून बंदूक चालवली जाऊ शकते. पारस यांना सक्रीय केल्यास चिराग यांच्यावर अंकुश ठेवण्यास मदत होऊ शकते, असे मानले जाते. दुसरीकडे भाजपसाठी धोकाही आहे. काकांचे महत्व वाढवल्यास चिराग नाराज होऊ शकतात. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला त्यांची नाराजी परवडणारी नाही. याचा फटका नितीश कुमार यांनाही बसू शकतो. त्यामुळे या राजकीय रणनीतीबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.    

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT