MLA Resignation : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हे दोघेही राज्यसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे ते आमदारकीचा राजीनामा कधी देणार, याबाबत उत्सुकता वाढली होती. अखेर या दोघांनीही सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. मात्र, नितीश कुमार यांनी केवळ आमदारकीचाच राजीनामा दिला असून अद्यापही ते मुख्यमंत्रिपदावर कायम आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
नितीश कुमार हे विधान परिषदेचे सदस्य आहेत. राज्यसभेचे सदस्य होण्याची इच्छा असल्याचे सांगत त्यांनी नुकतीच झालेली निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत ते विजयी झाले आहेत. त्यामुळे ते लवकरच आमदारकीसह मुख्यमंत्रिपदाचाही राजीनामा देतील, अशी चर्चा होती. पण त्यांनी आज केवळ आमदारकीचा राजीनामा दिला आहे.
बिहारमध्ये भाजप नेता मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. अद्याप त्यावर शिक्कामोर्तब झाले नसल्याने नितीश कुमार यांचा या पदाचा राजीनामा लांबल्याचे सांगितले जात आहे. जेडीयूतील काही नेत्यांनी नितीश कुमार यांच्या मुख्यमंत्रिपद सोडण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे भाजप कुणाला मुख्यमंत्री करणार, जेडीयूकडून त्या नावाला पसंती मिळणार का, असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित झाले आहेत.
नितीन नबीन हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत. ते बिहार विधानसभेचे सदस्य आहेत. अध्यक्षपद मिळाल्यापासूनच ते राज्यसभेवर जाणार अशी चर्चा होती. त्यानुसार त्यांनी राज्यसभा निवडणूक लढविली आणि निवडूनही आले. त्यामुळे आज त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. दोन्ही नेत्यांना आमदारकीचा राजीनाम्या देण्यासाठी १४ दिवसांची मुदत होती. ही मुदत आज संपणार आहे.
दरम्यान, नितीश कुमार हे बिहार सोडून दिल्लीत जाणार असल्याने पुढील काळात राज्यात अनेक मोठ्या घडामोडी घडणार आहेत. मुख्यमंत्री कोण असणार, मंत्रिमंडळात भाजप, जेडीयूसह इतर मित्रपक्षांना कोणती खाती मिळणार आदी मुद्द्यांभोवती राजकारण फिरणार आहे. प्रामुख्याने मंत्रिमंडळात जेडीयूला झुकते माप मिळण्याची शक्यता आहे. नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार हे राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊ शकतात, अशीही चर्चा आहे. पुढील काही दिवसांत याबाबतचे चित्र स्पष्ट होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.