Rahul Gandhi Sarkarnama
देश

Nirmala Sitharaman : राहुल गांधींच्या टीकेनंतर भाजपवर माफी मागण्याची वेळ; काय घडलं सीतारमण यांच्यासमोर?

Rahul Gandhi BJP GST Issue : केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांची तमिळनाडूतील एका हॉटेल व्यावसायिकाने माफी मागितल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.  

Rajanand More

New Delhi : केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. तमिळनाडूतील एका हॉटेल व्यावसायिकाने त्यांची माफी मागितल्याचा हा व्हिडिओ आहे. पण त्यावरून राजकारण तापले असून भाजपवर माफी मागण्याची वेळ आली आहे.

तमिळनाडूमध्ये आयोजित एका लघु व मध्यम मंत्रालयाच्या बैठकीसाठी सीतारमण उपस्थित होत्या. यादरम्यान त्यांनी व्यावसायिकांशी संवाद साधला. तमिळनाडूमध्ये प्रसिध्द असलेल्या अन्नपूर्णा हॉटेलचे मालक श्रीनिवास यांनी जीएसटीमधील अडचणी अर्थमंत्र्यांसमोर मांडल्या. त्यानंतर काही वेळातच त्यांनी खासगीत माफी मागितली.

भाजपच्या आयटी सेलकडून श्रीनिवास यांच्या माफीचा व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट करण्यात आला. त्यावरून अनेकांनी भाजपवर निशाणा साधला आहे. सत्ताधारी डीएमकेसह काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपला हल्ला चढवला. काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही सोशल मीडियातून भाजपला घेरलं.

राहुल गांधींच्या ट्विटनंतर काही वेळातच तमिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी जाहीरपणे माफी मागितली. त्यांनी म्हटले आहे की, तमिळनाडू भाजपच्या वतीने मी आमच्या पदाधिकाऱ्यांच्या कृत्याची माफी मागतो. एका सन्मानित व्यावसायिक आणि अर्थमंत्र्यांमधील खासगी संवाद सार्वजनिक केल्याबद्दल मी थिरू श्रीनिवासन अवल यांच्याशीही बोललो. हे प्रकरण आता इथेच थांबवा, अशी विनंतीही अण्णामलाई यांनी केली आहे.

राहुल गांधी काय म्हणाले?

राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, अन्नपूर्णा रेस्टॉरंटसारख्या छोट्या व्यवसायाचे मालक जीएसजीच्या सुसूत्रीकरणाची आपल्या सरकारी प्रतिनिधी मागणी करतात, तेव्हा त्यांना अपमानित केले जाते. तर दुसरीकडे कुणी अब्जाधीस मित्र नियम तोडतो किंवा राष्ट्रीय संपत्ती काबीज करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मोदीजी त्यांच्यासाठी रेड कार्पेट टाकतात.

संवादाचा व्हिडिओ व्हायरल

सीतारमण यांच्यासमोर अनेक छोटे व्यावसायिक बसले होते. त्यापैकी अन्नपूर्णाच्या मालकांनी खाद्य पदार्थ्यांवरील जीएसटीमध्ये सुसूत्रता आणण्याची मागणी केली. क्रीम असलेल्या बनवर १८ टक्के जीएसटी तर साध्य बनवर काहीच जीएसटी नाही. ग्राहक नेहमी तक्रार करतात, ते म्हणतात, तुम्ही फक्त बन द्या, आम्ही क्रीम आणि जॅम लावतो, असे एक उदाहरण श्रीनिवासन यांनी दिले होते. सुरूवातीला हा व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल झाला होता. पण संवादानंतर श्रीनिवासन यांनी खासगी भेटीत श्रीनिवासन हे माफी मागत असल्याचा व्हिडिओ भाजपने व्हायरल केला. हाच व्हिडिओ भाजपच्या अंगलट आला आणि प्रदेशाध्यक्षांनाच माफी मागावी लागली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT