Lok Sabha elections 2024 BJP News Sarkarnama
देश

Lok Sabha elections 2024 : 'रिपोर्ट कार्ड' असमाधानकारक असलेल्या खासदारांना मिळणार 'नारळ' ; भाजपकडून उत्तरप्रदेशात..

BJP News : उत्तरप्रदेशातील काही विद्यमान खासदारांच्या विरोधात जनमत आहे.

सरकारनामा ब्यूरो

New Delhi : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजपकडून आगामी निवडणुकीसाठी कुणाला तिकीट द्यायचे, यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. विद्यमान खासदारांनी केलेल्या कामगिरीची आढावा घेण्यात येत आहे. पक्षश्रेष्ठी या खासदारांचे प्रगतीपुस्तक तपासत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांना हरविण्यासाठी विरोधक सरसावले आहेत, अशा परिस्थितीत ‘रिपोर्ट कार्ड’ सुधारण्याची तंबी खुद्द मोदी-शाहांनी देऊनही ‘बिनधास्त ’ राहिलेल्या खासदारांच्या हाती नारळ दिला जाऊ शकतो. अशा खासदारांवर बारीक नजर ठेवलेल्या वरिष्ठांनी यादीच तयार केली आहे. वरिष्ठांच्या पावित्र्यामुळे भाजपच्या काही खासदारांची झोपच उडणार आहे. त्यांची सुरवात उत्तरप्रदेशातून झाली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उत्तर प्रदेश हे महत्त्वाचे राज्य आहे. या राज्यातून सर्वाधिक ८० खासदार येतात. उत्तरप्रदेशातील काही विद्यमान खासदारांच्या विरोधात जनमत आहे, त्यांच्या कामांवर मतदारराजा नाराज असल्याचे एका पाहणी आढळले आहे. अशा खासदारांना आगामी निवडणुकीत घरचा रस्ता दाखविण्याचा निर्णय भाजप श्रेष्ठींनी घेतला आहे.

उत्तर प्रदेशमधील एक चतुर्थांश खासदारांचे तिकीट कापण्याचा निर्णय घेतला आहे. यात काही केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश असणार आहे. केंद्रीय मंत्र्यांना लोकसभेची उमेदवारी न देता त्यांना राज्यसभेवर पाठविण्यात येणार आहे.

७५ पेक्षा अधिक वय असलेले, जनतेशी आणि पक्षातील कार्यकर्त्यांशी संपर्क नसलेल्या विद्यमान खासदारांच्या आगामी निवडणुकीत तिकीट मिळणार नाही हे निश्चित झाल्याची माहिती आहे. ‘रिपोर्ट कार्ड’ असमाधानकारक असलेल्या अशा खासदारांची यादी तयार झाली आहे.

यात किमान पंधरा ते सोळा खासदारांना नारळ देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील काही नेत्यांची यादी तयार केली जात आहे, ज्यांना लोकसभेची उमेदवारी देता येऊ शकते, अशा विद्यमान आमदारांची नावाची चाचपणी सुरु आहे.

उत्तर प्रदेशमधील भाजपचे ११ खासदार केंद्रात मंत्री आहेत. यामध्ये पंकज चौधरी (महाराजगंज), एस. पी. सिंह बघेल (आग्रा), भानू प्रताप सिंह वर्मा (जालौन), कौशल किशोर (मोहनलालगंज), राजनाथ सिंह (मतदारसंघ – लखनऊ), स्मृती इराणी (अमेठी), महेंद्र नाथ पांडे (चंदौली), जनरल (नि) व्ही. के. सिंह (गाझीयाबाद), साध्वी निरंजन ज्योती (फतेहपूर) संजीव कुमार बालियान (मुझफ्फरनगर), आणि अजय कुमार मिश्रा तेनी (खेरी) हे मंत्री आहेत.

२०१९ च्या निवडणुकीत भाजपाने ८० पैकी ६२ जागा जिंकल्या होत्या. तर त्यांचा घटक पक्ष असलेल्या अपना दलने (एस) दोन जागा मिळवल्या. बहुजन समाज पक्षाने समाजवादी पक्षासोबत आघाडी करून १० जागांवर विजय मिळवला. तर समाजवादी पक्षाला केवळ पाच जागा जिंकता आल्या. काँग्रेसने पारंपरिक समजला जाणारा रायबरेली मतदारसंघ राखण्यात यश मिळवले. मात्र अमेठीमधून राहुल गांधी यांचा पराभव झाला.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT