<div class="paragraphs"><p>Tejasvi Surya and Narendra Modi</p></div>

Tejasvi Surya and Narendra Modi

 

Sarkarnama

देश

तेजस्वी सूर्या पडले तोंडावर; विनाशर्त घ्यावी लागली माघार

सरकारनामा ब्युरो

बंगळूर : वादग्रस्त वक्तव्ये करून भाजपचे (BJP) खासदार व भारतीय जनता युवा मोर्चाचे (BJYM) राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या (Tejasvi Surya) हे कायम चर्चेत असतात. ते आता चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली असून, यावरून विनाशर्त माघार घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. चिथावणीखोर आणि प्रक्षोभक भाषण करुन त्यांनी दोन धर्मांत फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता.

उडपीतील श्रीकृष्ण मठात दोन दिवसांपूर्वी एक कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमात सूर्या यांनी भाषण केले होते. या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, सूर्या हे मोठ्या प्रमाणात ट्रोल होऊ लागले आहेत. भारतात हिंदूंचे पुनरुज्जीवन करायचे आहे, असे विधान त्यांनी केले होते. यासाठी आतापर्यंतच्या इतिहासात ज्या हिंदूंचे धर्मांतर झाले त्या सर्वांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्यात येईल, असे वादग्रस्त विधान केले होते. या विधानावरुन मोठा गदारोळ सुरू झाला आहे.

वादग्रस्त वक्तव्यावरून सूर्या हे तोंडघशी पडले आहेत. त्यांनी या प्रकरणी विनाशर्त माघार घेतली आहे. त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, उडपीतील श्रीकृष्ण मठात आयोजित कार्यक्रमात मी देशातील हिंदूंच्या पुनरुज्जीवनाबाबत बोललो होतो. माझ्या भाषणातील काही विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. मी माझी विधाने विनाशर्त मागे घेत आहे.

सूर्या हे दक्षिण बंगळूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. भाजयुमोच्या अध्यक्षपदी सूर्या यांची निवड करुन त्यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपविली आहे. मात्र, सूर्या यांनी त्यावेळी राज्यातील भाजप सरकारविरोधातच मोहीम उघडल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. बंगळूर हे दहशतवादी कारवायांचे केंद्रस्थान बनले आहे, असा धक्कादायक आरोप सूर्या यांनी केला होता. या प्रकरणी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही साकडे घातले होते.

त्यावेळी सूर्या यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारविरोधात वक्तव्य केले होते. सूर्या यांच्याविरोधात काँग्रेस आक्रमक झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी या प्रकरणात सूर्या यांची पाठराखण केली होती. याबद्दल भाजप नेत्यांनी खासगीत नाराजी व्यक्त केली होती. आपलाच खासदार राज्य सरकारची प्रतिमा मलिन करीत आहे, अशी खंत काही नेत्यांनी व्यक्त केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT