चंडीगड : पंजाबच्या आगामी विधानसभा निवडणुकीआधी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने (आप) भाजपसह काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. चंडीगड महापालिका निवडणुकीत आपने मुसंडी मारत सर्वाधिक जागा पटकावल्या असून, भाजपल्या दुसऱ्या क्रमांकावर फेकले आहे. विशेष म्हणजे काही आठवड्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीआधी मोठा विजय मिळवून आपने काँग्रेस आणि भाजपची चिंता वाढवली आहे.
चंडीगडमध्ये दर पाच वर्षांनी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत दरवेळी दिसून येते. या वेळी मात्र अपवाद झाला असून, आपने मुसंडी मारली आहे. पंजाबमधील विधानसभा निवडणुका काही आठवड्यांवर आलेल्या असताना आपने आपली ताकद दाखवून दिली आहे. यामुळे भाजपसह काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. विधानसभा निवडणुकीत आप, भाजप, काँग्रेस, अकाली दल - बहुजन समाज पक्ष आघाडी अशी चौरंगी लढत आहे.
चंडीगडमधील महापालिका निवडणूक ही विधानसभा निवडणुकीआधी होत असल्याने तिच्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आपने शून्यावर थेट सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत. आपचे नेते आता याला पंजाबच्या विधानसभा निवणुकीचा ट्रेलर मानू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत संपूर्ण चित्रपट दिसेल, असे आपचे नेते राघव चढ्ढा यांनी म्हटले आहे. आता आपने ट्रेलरमध्येच बाजी मारल्याने काँग्रेससह भाजपच्या पोटात गोळा आला आहे. दोन्ही पक्षांनी आता महापालिका निवडणुकीतील पराभवावर विचारमंथन सुरू केले आहे.
पक्षाच्या विजयावर बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, चंडीगड महापालिकेतील आपचा विजय हा पंजाबमधील बदलांचा संकेत आहे. चंडीगडमधील जनतेने भ्रष्ट राजकारणाला नाकारले असून, आपच्या प्रामाणिक राजकारण्यांना निवडले आहे. आपच्या सर्व विजयी उमेदवारांना शुभेच्छा. या वेळी पंजाब बदलासाठी तयार आहे.
पंजाब (Punjab) आणि हरियाना (Haryana) या राज्यांची राजधानी असलेल्या चंडीगडमधील (Chandigarh) महापालिका निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. चंडीगड महापालिकेतील (Chandigad Municipal Corporation) 35 पैकी 14 जागा आपने (AAP) जिंकल्या आहेत. भाजप (BJP) 12 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. काँग्रेस (Congress) 8 जागा मिळवत तिसरा स्थानी आहे. अकाली दलाला (Akali Dal) केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. भाजपचे आधी महापौर असलेले रविकांत शर्मा हे आपच्या उमेदवाराकडून पराभूत झाले आहेत. आपलाही या निवडणुकीत एक धक्का बसला असून, प्रचार प्रमुख चंदरमुखी शर्मा पराभूत झाले आहेत.
मागील महापालिका निवडणुकीत भाजपने 20 जागा मिळवल्या होत्या. त्यावेळी भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या अकाली दलाला एक जागा मिळाली होती. शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर अकाली दलाने भाजपसोबतची आघाडी तोडली होती. काँग्रेसला मागील निवडणुकीत 4 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसने आता आपल्या जागा दुपटीने वाढवल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.