Navi Delhi News : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाईची मागणी अख्खा देश करत आहे. तर या कारवाईला काँग्रेसनेदेखील आपला पाठिंबा दिला आहे. मात्र आता पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांच्या एका वक्तव्यामुळे भाजपने काँग्रेसवर बोचरी टीका केलीय.
पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी 2019 च्या बालाकोटमध्ये करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितले आहेत. यामुळे भडकलेल्या भाजपने काँग्रेस म्हणजे बाहेरुन ‘सीडब्ल्यूसी’ आणि आतून ‘पीडब्ल्यूसी’ (पाकिस्तान वर्किंग कमिटी) असल्याची बोचरी टीका केल्याने नवा वाद सुरू झाला आहे. ही टीका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी केलीय.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करताना, काँग्रेसने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केंद्राकडे केली होती. मात्र सर्जिकल स्ट्राइकचा मुद्दा उपस्थित करताना तो कुठे झाला याची माहिती आजपर्यंत देश वासियांनी देण्यात आली नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री चन्नी यांनी केली. तसेच पर्यटकांच्या सुरक्षेतील त्रुटींच्या चौकशीची मागणीही करताना गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा असे म्हणत गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाना साधला होता.
यानंतरच आता भाजपने पलटवार करताना काँग्रेस कार्यकारिणी म्हणजे बाहेरुन ‘सीडब्ल्यूसी’ आणि आतून ‘पीडब्ल्यूसी’ असल्याची जोरजार टीका केली. तर काँग्रेसवाले पाकिस्तानचे सैन्य आणि दहशतवाद्यांचे मनोधैर्य उंचावण्याचे काम करत असून ते त्यांना प्राणवायुचा पुरवठा करण्याचे काम नेहमीच करत असल्याचा आरोप देखील केला आहे. यावेळी संबित पात्रा यांनी, दरदिवशी काँग्रेसच्या एका नेत्याने पत्रकार परिषद घेऊन भारताला नावे ठेवावी, पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात आणि पाकिस्तानच्या समर्थनात बोलावे, हा योगायोग कसा होऊ शकतो, असा सवाल उपस्थित केला आहे.
तसेच त्यांनी बालाकोटवरील 2019 च्या सर्जिकल हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ माजली आणि त्यांच्या अनेक मंत्र्यांनी तो स्वीकारला देखील. मग अशास्थितीत चन्नी यांनी केलेले विधान भारतीय लष्कर आणि हवाईदलाच्या मनोबल खचविणारे आहे.
22 एप्रिल रोजी पहलगामचा हल्ला झाल्यापासून सैफुद्दीन सोझ, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, कर्नाटकचे मंत्री आर.बी.तिम्मापूर, बी.के.हरीप्रसाद, रॉबर्ट वद्रा, विजय वडेट्टीवार, मणिशंकर अय्यर, हिमाचलचे मंत्री चौधरी चंद्रकुमार या काँग्रेस नेत्यांनी केलेली विधाने पाहिली तर त्यांना पाकिस्तानी काँग्रेस कमेटी का म्हणून नये? असे म्हणत पलटवार केला आहे.
पात्रा यांनी, पाकिस्तानविरुद्ध कोणत्या वेळी, कुठे आणि कसे प्रत्युत्तर देणार याची रणनीती सरकारने सांगावी, असा प्रस्ताव काँग्रेस कार्यसमितीने पारित केल्याचा दावा देखील केला आहे. सरकारने स्ट्रॅटेजी सांगितली तर काँग्रेस वेळ न दवडता पाकिस्तानला सारी माहिती देईल असा दावाही पात्रा यांनी केलाय.
पहलगाम हल्ल्यावरून समाजवादी पक्ष आणि आम आदमी पक्ष हे पंतप्रधान मोदी यांचा विरोध करीत असल्याचे विधान पाकिस्तानच्या संसदेत एका सदस्याने केल्याचे सांगून पाकिस्तानमध्ये अखिलेश यादव आणि अरविंद केजरीवाल यांचा जयजयकार होत असल्याची टीका पात्रा यांनी केली. रावळपिंडी आघाडीत आपण पिछाडीवर राहू नये म्हणून राहुल गांधी यांनी चन्नी यांना टीका करायला लावली, असा उपरोधिक टीका पात्रा यांनी केली.
दरम्यान काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बालाकोटवरील सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणारे चरणजित सिंग चन्नी यांनी आपल्या वादग्रस्त विधानावरून घूमजाव केलाय. ‘सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितले जात नाहीत.
मी पण मागत नाही. हा अतिशय संवेदनशील मुद्दा असून त्याचा विपर्यास करू नये. ज्या निर्दोष पर्यटकांचा धर्म विचारून दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या, त्यांच्या कुटुंबांना केंद्र सरकारने न्याय द्यावा. आम्ही सरकारच्या सोबत आहोत,’ अशा शब्दात चन्नी यांनी आपल्या विधानावरून माघार घेतली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.