
Pahalgam Terrr Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मागील काही दिवसांपासून काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला जात आहे. हल्ल्यानंतर मोदी कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेसने केलेल्या एका पोस्टवरून राजकीय वातावरण तापलं आहे. या पोस्टमध्ये मोदींचे डोके, हात आणि पाय नसलेली इमेट शेअर करण्यात आली आहे.
काँग्रेसने एक्सवर केलेली ही पोस्ट पाकिस्तानच्या एका माजी मंत्र्यांनीही रिशेअर करत मोदींवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने फोटोवर ‘गायब’ असे म्हटले आहे. भाजपने या पोस्टवरून काँग्रेसला चांगलेच झोडले आहे. काँग्रेसची ही पोस्ट म्हणजे ‘सर तन से अलग’ अशी मानसिकता असलेल्या लोकांची भूमिका असल्याचे भाजपच्या नेत्यांनी म्हटले आहे.
भाजपचे प्रवक्ते आर. पी. सिंह यांनीही सोशल मीडियात एक पोस्ट केली आहे. त्यावर हातात चाकू घेतलेली एक व्यक्ती तो चाकू पाठीमागे लपवल्याचे दिसत आहे. पाकिस्तानचे दोस्त अशी कॅप्शन त्याला देण्यात आले आहे. डोक्यावर नेहरू टोपी आणि पांढरा टी-शर्ट घातलेली ही व्यक्ती आहे. त्यामुळे सिंह यांनी एकप्रकारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरच निशाणा साधल्याची चर्चा आहे.
पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी यांनी काँग्रेसची पोस्ट रिपोस्ट केली आहे. त्यावरून भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनीही काँग्रेसचा समाचार घेतला. त्यांनी म्हटले आहे की, ते (काँग्रेस) मोदींवर निशाणा साधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि पाकिस्तानला सिग्नल देत आहेत की, काँग्रेस पाकसोबत असून आपल्या देशासोबत नाही.
पंतप्रधानांवरील गायब पोस्टने काँग्रेस बॅकफूटवर गेले आहे. मागील काही दिवसांत काँग्रेस नेत्यांच्या विधानांमुळे काँग्रेसला फटका बसला आहे. महाराष्ट्रातील नेते विजय वडेट्टीवार यांनी दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या नाहीत, अशा अर्थाचे विधान केले होते. त्यावरूनही वाद निर्माण झाला होता. भाजपने दिल्लीत पत्रकार परिषद घेत वडेट्टीवारांवर टीका केली. इतर काही नेत्यांची विधानेही वादग्रस्त ठरली आहेत. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि राहुल गांधी यांना या नेत्यांना समज द्यावी लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.