Assembly Election Survey Sarkarnama
देश

Assembly Election Survey : भाजप राजस्थान हिसकावणार; काँग्रेसचं तीन राज्यांत सरकार? काय सांगतो ताजा ओपिनियन पोल ?

Chetan Zadpe

FIve State Election : केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, मिझोराममध्ये 7 नोव्हेंबरपासून सुरू होणारा मतदानाचा टप्पा पाच राज्यांमध्ये 30 नोव्हेंबरपर्यंत चालेल आणि 3 डिसेंबरला निकाल जाहीर होतील. तारखा जाहीर होताच, आता एक ओपिनियन पोल समोर आला आहे. ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला राजस्थानमध्ये मोठा विजय मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर तेलंगणात काँग्रेससाठी चांगली बातमी मिळू शकते. (Latest Marathi News)

पाच राज्यांसाठी ओपिनियन पोल -

राजस्थान -

एकूण जागा - 200

विद्यमान सरकार- काँग्रेस

ओपिनियन पोल अंदाज - भाजप

एबीपी-सी व्होटरच्या ओपिनियन पोलच्या अंदाजानुसार काँग्रेसला मिळणाऱ्या मतदानामध्ये घट होताना दिसत आहे. सर्वेक्षणानुसार राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत सरकारला मोठा धक्का बसू शकतो. कारण सत्तेत असलेल्या काँग्रेसला केवळ 59-69 जागा मिळताना दिसत आहेत. काँग्रेसला एकूण 42 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. त्याचवेळी भाजपला 47 टक्के मते मिळू शकतात, तसेच 127 ते 137 जागा भाजपला मिळू शकतात. राजस्थानमध्ये सरकार बदलण्याची परंपरा फार पूर्वीपासून आहे. त्यानुसार यंदा भाजपचे सरकार येण्याचा सर्वेक्षणाचा अंदाज आहे.

छत्तीसगड -

एकूण जागा- 90

विद्यमान सरकार- काँग्रेस

ओपिनियन पोल अंदाज- काँग्रेस

विधानसभेच्या एकूण 90 जागा असलेल्या छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार आहे. ओपिनियन पोलनुसार काँग्रेसला 45 ते 51 जागा मिळू शकतात. इथे काँग्रेस पुन्हा जिंकून सत्तेत राहू शकतो. काँग्रेसला 45 टक्के मते मिळतील, असा सर्वेक्षणाचा अंदाज आहे. सत्तेत परतण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपची छत्तीसगडमध्ये निराशा होऊ शकते. या ओपिनियन पोलमध्ये भाजपला 44 टक्के मतांसह 39 ते 45 जागा मिळताना दिसत आहेत.

मध्य प्रदेश -

एकूण जागा - 230

विद्यमान सरकार - भाजप

ओपिनियन पोलचा अंदाज - भाजप आणि काँग्रेसमध्ये निकराची स्पर्धा -

नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पाच राज्यांमध्ये सर्वाधिक रंजक लढत मध्य प्रदेशमध्ये पाहायला मिळू शकते, असा अंदाज बहुतांशी ओपिनियन पोलमधून पाहायला मिळत आहे. येथे भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होत असून, दोन्ही पक्षांना सारखी मते म्हणजे ४५ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. पोलनुसार भाजपला येथे 104 ते 116 जागा मिळू शकतात, तर काँग्रेसच्या खात्यात 113 ते 125 जागा जाऊ शकतात.

तेलंगणा -

एकूण जागा- 119

विद्यमान सरकार- तेलंगणा राष्ट्र समिती (TRS)

ओपिनियन पोल अंदाज- काँग्रेस

दक्षिण भारतीय राज्यात पक्षविस्ताराच्या प्रयत्नात असलेल्या भाजपला तेलंगणामध्ये किंचित येथे संधी आहे. मात्र, ओपिनियन पोलनुसार भाजप सत्तेच्या जादुई आकड्यांपासून फार दूर असल्याचे दिसत आहे. येथे भाजपला 5 ते 11 जागा मिळण्याची शक्यता आहे. यात विशेष बाब म्हणजे येथे विद्यमान मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या सरकारलाही धक्का बसू शकतो.

तेलंगणा राष्ट्र समिती म्हणजेच टीआरएसला येथे 43 ते 55 मिळू शकतात, असे ओपिनियन पोलमध्ये सांगितले आहे, तर काँग्रेसला 48 ते 60 जागा मिळण्याची शक्यता आहे. यामुळे येथे काँग्रेसला सरकार बनवण्याची संधी आहे.

मिझोराम -

एकूण जागा - 40

विद्यमान सरकार - मिझो नॅशनल फ्रंट (MNF)

ओपिनियन पोल अंदाज - कोणत्याही एका पक्षाला बहुमत नाही

मिझोराममध्ये कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळवणे कठीण असल्याचे मत ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आले आहे. येथे मिझो नॅशनल फ्रंट या स्थानिक पक्षाला 13 ते 17 जागा मिळतील, तर मिझोराम पीपल्स मूव्हमेंट या स्थानिक पक्षाला 9 ते 13 जागा मिळू शकतात. विशेष म्हणजे येथे काँग्रेसला 10 ते 14 जागा मिळण्याची शक्यता आहे.

कधी आणि कुठे निवडणुका ?

ईशान्येकडील राज्य मिझोराममध्ये 7 नोव्हेंबरला पहिल्यांदा मतदान होणार आहे. यानंतर छत्तीसगडमध्ये 7 नोव्हेंबर आणि 17 नोव्हेंबरला दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. 17 नोव्हेंबरलाच मध्य प्रदेशात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबरला आणि तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या पाच राज्यांमध्ये 3 डिसेंबरपासून मतमोजणी सुरू होऊन निकाल हाती येणार आहेत.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT