पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या ऐतिहासिक विजयाने राज्याच्या राजकारणात मोठा बदल घडवून आणला आहे. तब्बल 15 वर्षे सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसला पराभूत करून भाजपने एकहाती सत्ता मिळवली, ही बाब केवळ निवडणूक निकालापुरती मर्यादित नसून भविष्यातील राजकीय समीकरणांनाही दिशा देणारी ठरते आहे. आता सर्वात मोठा प्रश्न समोर येतो तो म्हणजे मुख्यमंत्रीपदाची धुरा नेमकी कोणाच्या खांद्यावर सोपवली जाणार?
खरतर पश्चिम बंगालच्या विजयामागे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रणनीतीचा मोठा वाटा असल्याचे मानले जाते. निवडणुकीदरम्यान आखलेली सूक्ष्म योजना, संघटनाची बांधणी आणि प्रचाराची आक्रमक शैली यामुळे भाजपला यश मिळाले.
याच पार्श्वभूमीवर आता पक्षाने केंदात मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच अमित शाहंकडे एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या निवडीची अधिकृतपणे जबाबदारी सोपवली आहे. तसेच बंगालचे निरीक्षक ही जबाबदारी त्यांच्याकडे असणार आहे, ज्यातून राज्यातील सत्तेचे व्यवस्थापन आणि पुढील राजकीय रणनीती ठरवली जाणार आहे.
दरम्यान, अमित शाह बंगालमध्ये पोहोचण्याआधी, बंगालच्या महिला नेत्या अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीचं बोलावणं आलं आहे. अग्निमित्रा पॉल यांचे नाव अचानकपणे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत पुढे आले आहे. बंगालच्या निवडणुकीत महिला सुरक्षेचा मुद्दा या निवडणुकीत महत्त्वाचा ठरला होता, त्यामुळे एका महिला नेत्याला संधी देण्याचा पर्याय भाजप विचारात घेऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत.
अग्निमित्रा पॉल यांनी आसनसोल दक्षिण मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. त्यांनी तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते तापस बॅनर्जी यांचा सुमारे 40,000 मतांनी पराभव केला. त्याआधी 2021 मध्येही त्यांनी पहिल्यांदाच निवडणूक जिंकत आपली राजकीय ताकद सिद्ध केली होती. तसेच पक्षाच्या मोठ्या सभांमध्ये त्यांनी प्रभावी भूमिका निभावली असून, त्यामुळे त्यांची पक्षातील लोकप्रियता वाढताना दिसते.
भवानीपूर मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांचा पराभव करणारे आणि अनेक वर्षे बंगालमध्ये भाजपचा चेहरा म्हणून ओळखले जाणारे सुवेंदु अधिकारी हे मुख्यमंत्रीपदासाठी सर्वात पुढे असल्याचे मानले जात आहे. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे आणि स्थानिक पातळीवरील प्रभावामुळे त्यांची दावेदारी मजबूत मानली जाते. त्याचवेळी दिलीप घोष, शामिक भट्टाचार्य आणि रूपा गांगुली यांची नावेही चर्चेत आहेत.
ममता बॅनर्जी यांनी पराभवानंतरही राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे भविष्यात त्या रस्त्यावर उतरून भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपला केवळ सत्ता चालवण्याचेच नव्हे तर मजबूत विरोधकाला सामोरे जाण्याचेही आव्हान असणार आहे.
एकूणच, बंगालमध्ये सत्तांतर झाले असले तरी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय हा पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. स्थानिक नेतृत्व, संघटन क्षमता, महिला प्रतिनिधित्व आणि राजकीय संदेश या सर्व बाबी लक्षात घेऊन भाजप अंतिम निर्णय घेईल, असे चित्र सध्या दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.