BJP MLA Viral Audio: बिहारमधील अलीनगर मतदारसंघाच्या भाजपा महिला आमदार मैथिली ठाकूर पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. सोशल मीडियावर सध्या त्यांचा एक ऑडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावरून राजकीय वर्तुळात आणि नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे. या ऑडिओमध्ये आमदार एका तरुणाशी फोनवर संतापून बोलताना ऐकू येत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या ऑडिओची अधिकृत पडताळणी झालेली नाही.
हा वाद एका बेपत्ता तरुणाच्या शोधाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. अलीनगर मतदारसंघातील नदियामी गावातील गौतम झा नावाच्या तरुणाने बेपत्ता युवकाच्या शोधासाठी प्रशासनाने अधिक लक्ष द्यावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर 4 जुलैच्या रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास आमदारांचा त्याला फोन आल्याचा दावा करण्यात आला आहे.
गौतम झा यांच्या म्हणण्यानुसार, फोनवरील संभाषणादरम्यान त्यांचे म्हणणे पूर्णपणे ऐकून न घेता त्यांच्यावर संताप व्यक्त करण्यात आला. व्हायरल होत असलेल्या ऑडिओमध्ये, त्या तरुणाला 'गाढव' आणि 'मूर्ख' यांसारख्या शब्दांनी संबोधून त्याच्यावर कारवाई करण्याची धमकी देत असल्याचा आरोप आहे.
पीडिताचा दावा आहे की, त्याचा कोणताही वैयक्तिक किंवा राजकीय हेतू नव्हता; परिसरातील बेपत्ता झालेल्या तरुणाला प्रशासनाने लवकरात लवकर शोधून काढावे, एवढीच त्याची इच्छा होती. आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्याचा आणि धमकीवजा भाषा वापरल्याचा आरोपही केला जात आहे.
या संपूर्ण प्रकरणामागे सुभाष चौपाल नावाच्या युवकाच्या बेपत्ता होण्याची घटना असल्याचे सांगितले जात आहे. सुभाष हा सुमारे 15 दिवसांपूर्वी हैदराबादहून आपल्या गावाकडे निघाला होता. मात्र, तो घरी पोहोचला नसल्याने कुटुंबीय चिंतेत होते. दरम्यान, आमदारांनी परिसरातील काही नागरिकांची भेट घेतली, मात्र बेपत्ता युवकाच्या कुटुंबीयांची भेट घेतली नसल्याचा आरोप करण्यात आला.
यानंतर गौतम झा यांनी संबंधित कुटुंबाची व्यथा सोशल मीडियावर मांडली. हा व्हिडिओ आणि त्यानंतरचा ऑडिओ व्हायरल झाल्याने वाद अधिक वाढला. आता या प्रकरणावर आमदार मैथिली ठाकूर यांची अधिकृत भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विरोधकांसह अनेक नागरिकांनीही या घटनेबाबत प्रश्न उपस्थित केले असून संपूर्ण प्रकरणाची चर्चा राज्यभर सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.