BJP Latest News Sarkarnama
देश

भाजपची पसमांदा मुस्लिमांना आकर्षित करण्याची मोहीम ठरली!

BJP : अटलबिहारी वाजपेयी यांच्या ‘टीम' मध्ये १९८० च्या दशकातही सिकंदर बख्त यांच्यासारखे नेते होते.

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या सर्वच बाबतीत मागासलेले आणि दडपलेले राहिलेल्या पसमांदा मुसलमान समाजाला भारतीय जनता पक्षाकडे आकृष्ट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या 'रोडमॅप' नुसार भाजपची देशव्यापी यंत्रणा कामाला लागली आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून भाजपच्या अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने नवीन वर्षात (जानेवारी २०२३ पासून) एकूण संख्येच्या तब्बल ९० टक्के असलेल्या पसमांदा मुस्लिम समाजाच्या घरोघरी जाऊन त्यांना भाजपचा गरीब कल्याण व विकासाचा मंत्र पटवून देण्याची महत्वाकांक्षी देशव्यापी मोहीम आखण्यात आली आहे. अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी या माहितीला दुजोरा दिला. (BJP Latest News)

मुसलमान समाजातील एका मोठ्या वर्गाला स्वातंत्र्यानंतरच्या साडेसात दशकात सुविधा व विकासापासून वंचित ठेवण्यात आले, त्यांची फसवणूक केली गेली. त्यांना आम्ही विकासाच्या मुख्य प्रवाहात आणू, असा भाजपचा प्रचारबिंदू असून रामपूर व आझमगडसारख्या लोकसभा मतदारसंघांत नुकत्याचे मिळवलेल्या यशानंतर पसमांदा वर्गाबाबतचे पंतप्रधानांचे निरीक्षण कमालीचे अचूक असल्याचे भाजप नेते सांगतात.

देशातील एकूण मुस्लिम लोकसंख्येच्या १०-१५ टक्के लोकांना (अश्रफ-सैय्यद) उच्चवर्गीय किंवा उच्चवर्णीय मानले जाते. परंतु या व्यतिरिक्त उर्वरित तब्बल ८५ ते ९० टक्के समाज (किमान २५ कोटी) अरझल आणि अजलफ वर्गात गणले जातात. भारतीय मुसलमान म्हणजे रोजीरोटीची भ्रांत असलेला, गरीब व मागासलेला असतो हा समज दृढ होण्यात पसमांदा समाजाबाबत केलेली फसवणूक हे मुख्य कारण आहे.

भाजप हाच समज आपल्या कृतीतून बदलण्याचा प्रयत्न करत आहे,असे सिद्दीकी यांनी सांगितले. पसमांदा समाजाचा केवळ विश्वास मिळविणे नव्हे तर त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप प्रामाणिक प्रयत्न करत आहे, हा ‘मेसेज' घरोघरी जाऊन आम्ही देणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

भाजपच्या प्रस्तावित ‘घर घर दस्तक' मोहीमेच्या पूर्वतयारीसाठी अल्पसंख्यांक विभागाच्या सुमारे ३५ हजार कार्यकर्त्यांचे राज्यनिहाय प्रशिक्षण सुरू आहे. महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण डिसेंबरमध्ये ठाण्यातील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत होणार आहे. त्यानंतर नवीन वर्षात हे कार्यकर्ते पसमांदा समाजात घरोघरी जाऊन भाजपचा ‘गरीब कल्याण हा विचार रूजविण्याचा प्रयत्न करतील.

भाजपच्या स्थापनपेपासून आपल्यापर्यंत पसमांदा मुसलमान समाजाला पक्षाने नेहमीच मानाचे स्थान दिल्याचे सिद्दीकी यांनी सांगितले. ते म्हणाले की भाजपच्या स्थापनेवेळी दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या ‘टीम' मध्ये १९८० च्या दशकातही सिकंदर बख्त यांच्यासारखे नेते होते. अल्पसंख्यांक विभागात तर शाहनवाज हुसेन यांच्यासारखे अपवाद वगळता बहुतांश राष्ट्रीय अध्यक्ष पसमांदा समाजातीलच होते, आहेत असाही सिद्दीकी यांनी दावा केला.

उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने मदरशांच्या तपासणीची जी मोहीम सुरू केली ती वादग्रस्त ठरली. मात्र यात गैर काही नाही,असे मत सिद्दीकी यांनी मांडले. ते म्हणाले, त्या-त्या राज्यांच्या मदरसा मंडळांचा अभ्यासक्रम शिकवणारे, नोंदणीकृत मदरसे कोणी हटवू शकत नाही. मात्र जे गैर नोंदणीकृत म्हणजे अनधिकृत मदरसे आहेत, जेथे तालिबानी अभ्यासक्रम शिकवला जातो अशांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. मदरशांच्या तपासणीची ही मोहीम देशभर राबविणे आवश्यक आहे. दहशतवादाला कोणता रंग व धर्म नसतो. दहशतवादी केंद्रांवर कठोर कारवाई वेळीच करणे अत्यावश्यक आहे, असेही सिद्दीकी म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास' या धोरणाअंतर्गत पसमांदा मुस्लिम वर्गाचा विश्वास संपादन करण्यासाठी भाजपने सुरू केलेले ‘सबका प्रयास' चे धोरण पसमांदा समाजाची आर्थिक, शैक्षणिक दुरवस्थेची परिस्थिती बदलणारे ठरले तर ती अत्यंत एतिहासिक घटना असेल, असे मत राजकीय विश्लेषक सईद अंसारी यांनी व्यक्त केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT