Mayawati
Mayawati  Sarkarnama
देश

पराभवानंतर मायावतींचा हिसका; तीन नेते सोडून इतरांना दाखवला बाहेरचा रस्ता

सरकारनामा ब्युरो

लखनौ : उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत (Assembly Elections) माजी मुख्यमंत्री मायावती (Mayawati) यांच्या बहुजन समाज पक्षाला (BSP) केवळ एकच जागा मिळाली. कधीकाळी उत्तर प्रदेशावर राज्य करणाऱ्या मायावती यांच्या पक्षाची पहिल्यांदाच एवढी वाताहात झाली. हा पराभव मायावतींच्या चांगलाच जिव्हारी लागला असून रविवारी त्यांनी नेत्यांना हिसका दाखवला आहे.

मायावती यांनी रविवारी लखनौ येथील पक्षाच्या कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी तीन नेत्यांना वगळून इतर सर्वांना कार्यकारिणीतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. या बैठकीत मायावती यांनी सर्व उमेदवार आणि पदाधिकारीही बोलावण्यात आले होते. पराभवाच्या कारणांवर बैठकीच चर्चा करण्यात आली. त्यानंतर त्यांनी राज्यातील पक्षाच्या सर्व कार्यकारिणी बरखास्त केल्या.

हे करताना त्यांनी तीन मुख्य समन्वयकांची नियुक्ती केली. यामध्ये मुनकाद अली, राजकुमार गौतम आणि विजय कुमार या नेत्यांचा समावेश आहे. हे तिघे थेट मायावतींच्या संपर्कात असतील. त्यामुळे आता बसपाच्या संघटनात्मक रचनेमध्ये आणखी महत्वाचे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बसपाला निवडणुकीत 403 पैकी केवळ एकच जागा मिळाल्याने त्याचा थेट परिणाम आता पक्ष संघटनेत दिसू लागले आहेत.

अशी राहिली मायावतींची वाटचाल!

मायावती यांनी २००७ मध्ये २०१७ जागा मिळवीत सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी पक्षाच्या मतदानाची टक्केवारी ३०.४३ टक्के होती. २०१२ मध्ये हे प्रमाण २६ टक्के तर २०१७ मध्‍ये २२.३३ टक्के असे होते. उत्तर प्रदेशमधील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील बादलपूर गावात मायावती शिक्षिका होत्या. कांशीराम यांनी १९८४ मध्ये स्थापन केलेल्या बहुजन समाज पक्षात त्यांनी प्रवेश केला. राजकीय क्षेत्रात त्या ‘बहेनजी’ नावाने प्रसिद्ध झाल्या. जून १९९५ मध्ये त्या पहिल्यांदा ‘यूपी’च्या मुख्यमंत्री झाल्या. पण त्यावेळी त्यांची सत्ता अल्पजीवी ठरली. काही महिन्यांत ‘बसप’चे सरकार कोसळले. त्यानंतरच्या काही वर्षांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये कोणत्याही पक्षाचे सरकार पूर्ण बहुमताने येऊ शकले नाही. त्याकाळात मायावती या भाजपच्या पाठिंब्यावर एकदा नाही तर तीन वेळा मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत बसल्या. २००७ मध्ये ‘बसप’ला पूर्ण बहुमत मिळवून मायावतींचे सरकार स्थापन झाले. अशा प्रकारे मायावती यांनी चार वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रिपद भूषविले आहे.

‘बसप’ला २००७ मध्ये ऐतिहासिक यश मिळाले. सत्ताधारी समाजवादी पक्षाचा पराभव करीत त्या स्वबळावर निवडून आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’चा नारा देत ‘सोशल इंजिनिअरिंग’चा प्रयोग यशस्वी ठरला. यामध्ये ब्राह्मण समाजाची मते निर्णायक ठरल्याचे मानले जाते. याकाळात कांशीराम यांची प्रकृती बिघडू लागल्याने त्यांनी पक्षाची धुरा मायावतींकडे सोपविली आणि हा त्यांच्यासाठी सुवर्णक्षण ठरला. पण त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली. स्वतः व दलित समाजाच्या प्रतिकांचे पुतळे उभारण्याचा सपाटा त्यांनी लावला. अनेक संस्थांच्या नावात बदल केला. मायावती यांचा यमुना एक्सप्रेसवेचा प्रकल्पावरही टीका झाली होती.

अस्तित्व जाणवलेच नाही

सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर मायावतींच्या अडचणीत भर पडली. हुकूमशाही वागणे, सहकाऱ्यांकडे दुर्लक्ष, माध्यमांशी दुरावा राखणे अशा वर्तनामुळे अनेक वरिष्ठ नेत्यांनी त्यांची साथ सोडली. यात ‘बसप’च्या स्थापनेपासूनच्या काही नेत्यांचा समावेश होता. विधानसभा निवडणुकीच्या आधी पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष राम अचहर राजभार, पक्षाचे विधानसभेतील नेते लालजी वर्मा यांसारख्या निष्ठावंतांनीही पक्षाला सोडचिठ्ठी देत समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. या संपूर्ण निवडणुकीत मायावतींचे अस्तित्व दिसलेच नाही. भाजपचा ‘बी’ पक्ष अशी टीका ‘बसप’वर प्रचारादरम्यान झाली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT