Naveen Patnaik sarkarnama
देश

Naveen Patnaik News : बाबासाहेब आंबेडकरांचे नावे मुख्यमंत्र्यांची 'नवीन' खेळी!

Anand Surwase

Bhubaneswar : लोकसभा आणि ओडिशा विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असतानाच मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी नवा डाव टाकला आहे. पटनायक यांनी भूवनेश्वर येथे नव्याने बांधण्यात आलेल्या अत्याधुनिक अशा आंतरराज्य बस टर्मिनलला घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकराचे नाव दिले आहे. या निर्णयातून पटनायक यांनी आंबेडकरांचे देशाप्रती असलेल्या योगदानाचा गौरव करण्याचा आणि दलित मतदारांमध्ये पक्षाची चांगली प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी काळातील निवडणुकांच्या दृष्टीने पटनायक यांनी नामांतराच्या एकाच निर्णयातून अनेक गोष्टी साध्य केल्या असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. (Naveen Patnaik News)

ओडिशामध्ये बांधण्यात आलेले बस टर्मिनल हे विमानतळासारख्या सुविधांनी सुसज्ज आहे. हे राज्यातील सर्वात मोठे टर्मिनल आहे. हे बस टर्मिनल तब्बल 15.5 एकर परिसरात विस्तारलेले असून याच्या बांधकामासाठी 180 कोटी रुपये खर्च आला आहे.फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस याचे लोकार्पण केले जाण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर पटनायक यांनी या टर्मिनलला डॉ. आंबेडकरांचे ( B R ambedkar ) नाव दिले आहे. डॉ.आंबेडकरांच्या नावावर असलेले हे ओडिशा (odisha) राज्यातील सर्वात मोठे टर्मिनल आहे.

मुख्यमंत्री पटनायक (Naveen Patnaik) यांनी सोमवारी (ता.5) या टर्मिनलला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची घोषणा केली होती. याबाबत बोलताना पटनायक म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे देशाप्रती असेलल्या योगदानाचा प्रचार व्हावा, त्यातून स्फुर्ती मिळावी म्हणून हा निर्णय घेतला आहे. तसेच समाजसुधारक आंबेडकरांनी आपले संपूर्ण जीवन हे समता आणि सर्वांना न्याय मिळेल यासाठी समर्पित केले होते. त्यामुळे टर्मिनलमध्ये त्यांच्या कार्याची माहिती देणारे एक भव्य दालन उभारले जाणार आहे. त्यामध्ये संविधानाची प्रत आणि डॉ.आंबेडकरांच्या काही वस्तू नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत.

निर्णय एक...फायदे अनेक

चालू वर्ष हे निवडणुकांचे वर्ष आहे. आगामी काळात लोकसभेच्या आणि त्यानंतर ओडिशा विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर बस टर्मिनलला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव दिल्याने हा विषय चर्चेचा ठरत आहे. कारण या एका निर्णयातून पटनायक यांनी अनेक गोष्टी साध्य केल्या आहेत. त्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे यापूर्वीचे बहुतांश प्रकल्पांना नवीन पटनायक यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री बिजू पटनायक यांचे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे बिजु पटनायक यांच्या नावाचा अतिरेकामुळे होणारी संभाव्य राजकीय टीका टाळली आहे. तसेच आंबेडकरांचे नाव दिल्याने राज्यातील सुमारे 72 लाख दलित मतदारामध्ये बिजु जनता पार्टीची प्रतिमा चांगली होण्यास मदत होणार असून एक सकारात्मक मतप्रवाह निर्माण करण्याचा पटनायक यांचा प्रयत्न दिसून येतो.

प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न

एखाद्या मोठ्या प्रकल्पाला नाव देताना मोठ्या प्रमाणात राजकारण केले जाते. मात्र डॉ. आंबेडकरांच्या नावाला विरोध होण्याची शक्यता कमी आहे. तसेच निवडणुकीत होणाऱ्या फायद्यांपेक्षा जास्त फायदा हा बीजेडी पक्ष हा सर्वधर्म समभाव मानणारा पक्ष म्हणून प्रतिमा निर्माण होण्यास मदत होणार आहे. तसेच राज्यघटनेबद्दल पराकोटीचा आदर असलेला आणि सामाजिक एकता जोपसण्यासाठी प्रयत्न करणार नेता म्हणून आपली ओळख निर्माण करण्यास पटनायक यांना या निर्णयामुळे मदत होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून केली जात आहे. तसेच काँग्रेसकडून सध्या बीजेडीला भाजपची बी टीम दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. काँग्रेसकडून बिजु जनता दलाची प्रतिमा मलिन करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे. त्यातून आंबेडकरांच्या नावाचे कार्ड वापरून पटनायक हे मतदारांमध्ये आपली आणि पक्षाची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT