West Bengal Election: भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत ७५ वर्षांत एकदाही झालं नाही असं विक्रमी मतदान यंदा पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या दोन राज्यांमध्ये झालं आहे. मुख्य आय़कु्त ज्ञानेश कुमार यांनी याची माहिती दिली. याची सविस्तर आकडेवारीच निवडणूक आयोगानं जाहीर केली आहे. इतक्या प्रमाणावर मतदान वाढण्यामागं आयोगानं केलेल्या विविध मोहिमांचा हा परिणाम असल्याचंही ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं आहे.
ज्ञानेशकुमार म्हणाले, "स्वातंत्र्यापासून आत्तापर्यंतच सर्वाधिक मतदान पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूत झालं. भारतीय निवडणूक आयोग पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूतील प्रत्येत मतदाराला सलाम करतो"
तामिळनाडूमध्ये एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. तर पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. यांपैकी पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं. तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यात आज सकाळी ७ वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान पार पडलं. यामध्ये तामिळनाडूत ८४.६९ टक्के मतदान झालं तर पश्चिम बंगालमध्ये संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ९१.७८ टक्के इतक विक्रमी मतदान झालं.
दरम्यान, तामिळनाडूत झालेल्या एकूण मतदानापैकी पुरुषांची मतदानाची टक्केवारी ८३.५७ टक्के तर महिलांची टक्केवारी ८५.७६ टक्के इतकी आहे. तर ६०.४९ टक्के तृतीयपंथियांनी इथं मतदान केलं. अशी सर्वांची मिळून सरासरी मतदान हे ८४.६९ टक्के झाली आहे. तर दुसरीकडं पश्चिम बंगालमध्ये ९०.९२ टक्के पुरुषांचं मतदान तर ९२.६९ टक्के महिलांचं मतदान झालं आहे. तसंच ५६.७९ टक्के तृतीयपंथीयांनी मतदान केलं. अशी एकूण ९१.७८ टक्के मतदान पश्चिम बंगालमध्ये पार पडलं. विशेष म्हणजे या दोन्ही राज्यांमध्ये महिलांच्या मतदानाची टक्केवारी जास्त आहे.
निवडणूक आयोगानं पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या दोन्ही राज्यांमध्ये सखोल मतदार फेरपडताळी प्रक्रिया अर्थात एसआयआर राबवलं होतं. यामध्ये सुमारे २६ लाख मतदारांना तांत्रिक कारणामुळं मतदानापासून वंचित राहावं लागलं. तर ६० लाख मतदारांची नावं विविध कारणांसाठी (मृत्यू, स्थलांतर, दुबार) बाद करण्यात आली. यामुळं ही प्रक्रिया बरीच गाजली होती. तामिळनाडूतही एसआयआर प्रक्रिया वादग्रस्त ठरली होती.
त्याचबरोबर निवडणूक आणि हिंसाचार हे पश्चिम बंगालमधील समीकरण उखडून काढण्यासाठी यंदा निवडणूक आयोगानं जबरदस्त सुरक्षा यंत्रणा राबवली. स्थानिक पोलिसांच्या हातात नियंत्रण न देता थेट राज्य राखीव दल आणि केंद्रीय राखीव दलाच्या जवांनाना पाचारण करण्यात आलं होतं. त्यामुळं निवडणुकीतील गैरप्रकार कमी झाले असा दावा निवडणूक आयोगाकडून केला जाऊ शकतो.
यानंतर नव्या मतदारांनासाठी वोटर फ्रेन्डली इनिशिएटिव्ह उपक्रम राबवण्यात आला. त्यानुसार, उमेदवारांचे सहजरित्या दिसून येतील असे कलर फोटो ईव्हीएम मशिनवर लावण्यात आले होते. त्याचबरोबर मतदान केंद्रांवर मतदारांना मोबाईल ठेवण्याची सोय करण्यात आली होती. नव्या प्रकारच्या मतदार माहितीच्या स्लीप तयार करण्यात आल्या होत्या, यामुळं सहजरित्या माहिती वाचता येणार होती. त्याचबरोबर मतदान केंद्रांवर अपंग मतदारांसाटी व्हीलचेअर ठेवण्यात आल्या होत्या, तसंच त्यांना सर्व ती मदत पुरवण्यात आल्याचंही निवडणूक आयोगानं काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.