चंडीगड : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस झाल्यानंतरच्या पहिल्याच परिक्षेत विनोद तावडे (vinod Tawade) नापास झाले आहेत. चंडीगड महापालिका निवडणुकीचा (Chandigad Municipal Corporation election result) निकाल हाती आला असून यात भाजपला सत्ता गमावावी लागली आहे. या निवडणुकासाठी विनोद तावडे हे भाजपचे प्रभारी होते. निकालात आपने मुसंडी मारत सर्वाधिक जागा पटकावल्या असून, सत्तेत असलेला भाजप दुसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. तर काँग्रेस तिसऱ्या जागेवर असून शिरोमणी अकाली दलाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.
गत महापालिका निवडणुकीत भाजपने ३५ पैकी २० जागा मिळवल्या होत्या. यंदा पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Punjab) चंदीगड महापालिका निवडणुकीकडे (Chandigad Municipal Corporation) सगळ्यांचे लक्ष लागले होते. यात आता ३५ पैकी १३ जागा आपने (AAP) जिंकल्या आहेत. तर सत्तेतील भाजप (BJP) १२ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. काँग्रेस (Congress) ८ जागा मिळवत तिसऱ्या स्थानी आहे. अकाली दलाला (Akali Dal) केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. विषेश म्हणजे भाजपचे महापौर रविकांत शर्मा हे पराभूत झाले आहेत. तर आपलाही या निवडणुकीत एक धक्का बसला असून त्यांच्या प्रचार प्रमुख चंदरमुखी शर्मा पराभूत झाल्या आहेत.
चंडीगडमध्ये दर पाच वर्षांनी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत दरवेळी दिसून येते. या वेळी मात्र आपने या निवडणुकीत उडी घेतली होती. त्यात आपने मुसंडी मारली आहे. सोबतच पंजाबमधील विधानसभा निवडणुका काही आठवड्यांवर आलेल्या असताना आपने आपली ताकद दाखवून दिल्यामुळे भाजपसह काँग्रेसच्याही गोटात चिंतेचे वातावरण आहे. आपचे नेते आता याला पंजाबच्या विधानसभा निवणुकीचा ट्रेलर मानू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत संपूर्ण चित्रपट दिसेल, असे आपचे नेते राघव चढ्ढा यांनी म्हटले आहे. आता आपने ट्रेलरमध्येच बाजी मारल्याने काँग्रेससह भाजपच्या पोटात गोळा आला आहे. दोन्ही पक्षांनी आता महापालिका निवडणुकीतील पराभवावर विचारमंथन सुरू केले आहे.
आपच्या विजयावर बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, चंडीगड महापालिकेतील आपचा विजय हा पंजाबमधील बदलांचा संकेत आहे. चंडीगडमधील जनतेने भ्रष्ट राजकारणाला नाकारले असून, आपच्या प्रामाणिक राजकारण्यांना निवडले आहे. आपच्या सर्व विजयी उमेदवारांना शुभेच्छा. या वेळी पंजाब बदलासाठी तयार आहे. तर भाजपच्या पराभवानंतर विनोद तावडे यांनी ट्विट करुन चंदीगडमधील जनतेचे भाजपला मतदान केल्याबद्दल आभार मानले आहेत. विनोद तावडेंकडे सध्या हरियाणा निवडणूक प्रभारी पदाची देखील जबाबदारी आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.