Andhra Pradesh Chief Minister Chandrababu Naidu announces financial incentives for families having third and fourth children during a public event in Srikakulam. Sarkarnama
देश

Andhra Pradesh : भाजपला सत्तेत आणणाऱ्या ‘किंगमेकर’ सरकारची भन्नाट घोषणा ; तिसरे अपत्य जन्माला घातल्यास 30 हजार तर चौथ्यासाठी 40 हजार देणार

Chandrababu Naidu Announces New Population Growth Scheme : आंध्र प्रदेशची लोकसंख्या कमी होत असून त्यावर उपाययोजनेचा भाग म्हणून सीएम चंद्राबाबू नायडू यांनी ही खास घोषणा केली आहे.

Ganesh Sonawane

Andhra Pradesh : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पक्षाचे (TDP) प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी एक मोठी घोषणा केली आहे, ज्याची सर्वत्र देशभरात चर्चा रंगली आहे. आंध्र प्रदेश राज्यातील लोकसंख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने त्यात वाढ व्हावी म्हणून राज्य सरकारकडून पालकांना प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे.

आंध्र प्रदेशात जन्मलेल्या तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी अनुक्रमे ३० हजार रुपये आणि ४० हजार रुपये रोख रक्कम दिली जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी शनिवारी केली. राज्याची लोकसंख्या कमी होत असून त्यावर उपाययोजनेचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

श्रीकाकुलम जिल्ह्यातील नरसण्णापेटा येथे 'स्वर्ण आंध्र स्वच्छ आंध्र' या स्वच्छता कार्यक्रमासाठी आयोजित जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री नायडू यांनी ही घोषणा केली. यासंबंधी अधिक तपशील एका महिन्याच्या आत जाहीर केले जातील असे त्यांनी सांगितले. तिसऱ्या मुलाला जन्माला घालणाऱ्यांना 30 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता दिला जाईल. तर, चौथ्या मुलाला जन्म देणाऱ्यांना 40 हजार रुपयांचा भत्ता दिला जाईल अशी माहिती मुख्यमंत्री चंद्राबाबू यांनी दिली.

नायडू हे लोकसंख्या उपाययोजनांचे पुरस्कर्ते होते. त्यांनी काही वर्षांपूर्वी लोकसंख्या नियंत्रणाचं समर्थन केलं होतं. मात्र, आता जन्मदर वाढवण्याच्या दृष्टीने समाजाने प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. दुसऱ्या अपत्यासाठी २५ हजार रुपये रोख रक्कम मदत म्हणून देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे, अशी माहिती यापूर्वी, ५ मार्च रोजी नायडू यांनी विधानसभेत दिली होती.

बदलत्या सामाजिक आणि आर्थिक ट्रेंडमधील बदलाचा कुटुंबाच्या आकारावर परिणाम होत असल्याचं मत नायडू यांनी मांडले. लोकसंख्या वाढीचा दर कायम राखण्यास प्रत्येक स्त्रीमागे २.१ मुलांचा जन्म होणे आवश्यक आहे. परंतु अनेक जोडपी एका मुलाचा पर्याय स्वीकारत आहेत. तर काहीजण पहिले अपत्य मुलगी असल्यास दुसऱ्या अपत्याला जन्म देतात. त्यामुळे राज्याची लोकसंख्यावाढ कमी होत असल्याचे नायडू यांचे म्हणणे आहे.

चंद्राबाबू 'किंगमेकर'

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत न मिळाल्यामुळे, केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती. त्यावेळी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पक्षाचे (TDP) प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) पूर्ण पाठिंबा दिला. भाजपला केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी टीडीपीचे १६ खासदार निर्णायक ठरले असून, नायडू ‘किंगमेकर’ म्हणून उदयास आले होते. भाजपने चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाचे १६ खासदार व नितीश कुमार यांच्या पक्षाचे (JDU) १२ खासदार यांच्या मदतीने केंद्रात सरकार स्थापन केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT