Chirag Paswan Narendra Modi  sarkarnama
देश

Chirag Paswan News: पंतप्रधान मोदींचा 'हनुमान' खरंच 'एनडीए'ची साथ सोडणार?

NDA And Lok Janshakti Party : भाजप आणि एनडीएच्या इतर मित्रपक्षांना आम्हाला सोबत घ्यायचे असेल तर आमची लोकजनशक्ती पार्टी तयार आहे. माझे विचार नेहमीच सरकारची भूमिका प्रतिबिंबित करत असतात असेही खासदार चिराग पासवान यांनी सांगितले.

Deepak Kulkarni

Patna News: एनडीएमधील घटक पक्ष असलेल्या बिहारमधील लोक जनशक्ती(रामविलास पासवान) पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार चिराग पासवान यांचं राजकीय वजन दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. पक्षातच नव्हे तर एनडीएतही चिराग हे महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'हनुमान' असल्याचे उद्गार पासवान यांनी काढले होते. ते मोदींचे कट्टर समर्थक आहेत.

पण एनडीएत नितीश कुमारांच्या 'जेडीयू'ची एन्ट्री झाल्यापासून चिराग हे काहीसे नाराज असल्याची चर्चा आहे. ते एनडीएची साथ सोडणार असल्याची जोरदार चर्चा बिहारच्या राजकारणात जोरदारपणे सुरू आहे. याचवेळी चिराग पासवान (Chirag Paswan) यांनी मोठं विधान केलं आहे.

केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पार्टीचे प्रमुख चिराग पासवान शुक्रवारी(ता.30)मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एनडीए आणि भाजपसोबतच्या युतीतून बाहेर पडण्याच्या चर्चांवर रोखठोक भाष्य केले.

ते म्हणाले,आपण एनडीएमध्येच राहणार आहोत.विरोधक माझा पक्ष आणि खासदारांविषयी संभ्रम निर्माण करू पाहत आहे.त्यांना चिराग पासवानला संपवता येईल असं वाटतं,पण तेव्हाही मला संपवू शकले नाहीत आणि आताही त्यांना ते शक्य होणार नाही असा टोला पासवान यांनी राजकीय विरोधकांना लगावला आहे.

माझ्याविरोधात विरोधकांकडून 2021 मध्ये असाच कट रचण्यात आला होता .त्याच कटाला खतपाणी घालण्याचा सध्या प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

'जोपर्यंत ते पंतप्रधान आहेत, तोपर्यंत मी...'

माझं पीएम नरेंद्र मोदींवर(Narendra Modi) अतूट प्रेम आहे. त्यांच्यापासून आपण कधीही दूर जाऊ शकत नाही. जोपर्यंत ते पंतप्रधान आहेत, तोपर्यंत मी त्यांच्यासोबत असणार आहे.आमच्या पक्षाची बिहार आणि केंद्रात भाजपसोबत युती आहे. त्यामुळे आम्ही राष्ट्रीय स्तरावर आणि आमच्या गृहराज्यात युती धर्माचे पालन करणार असल्याचा पुनरुच्चारही मंत्री चिराग पासवान यांनी यावेळी केला

यावेळी त्यांनी आगामी काळात होत असलेल्या झारखंड विधानसभा निवडणुकीवरही भाष्य केले. ते म्हणाले, भाजप आणि एनडीएच्या इतर मित्रपक्षांना आम्हाला सोबत घ्यायचे असेल तर आमची लोकजनशक्ती पार्टी तयार आहे. माझे विचार नेहमीच सरकारची भूमिका प्रतिबिंबित करत असतात असेही खासदार चिराग पासवान यांनी सांगितले.

आरजेडीचे आमदार मुकेश रोशन यांनी चिराग पासवान यांच्यासोबत मोठा खेला होणार असून त्यांच्या पक्षाच्या तीन खासदारांना भाजप आपल्याकडे ओढण्यासाठी प्रयत्नशील आहे, असा खळबळजनक दावा केला होता. यानंतर चिराग पासवान NDA तून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

बिहारमधील लोक जनशक्ती (रामविलास पासवान) पक्षाचे प्रमुख आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान सोशल मीडियात ट्रेंडिंगमध्ये आहेत. त्याला कारणही तसेच आहे. केवळ पाच खासदारांच्या ताकदीवर ते थेट एनडीए सरकारला भिडत असतात. एससी, एसटी आरक्षणातील उपवर्गीकरणास पासवान यांनी उघडपणे विरोध करत काही दिवसांपूर्वी झालेल्या भारत बंदला पाठिंबा जाहीर केला होता.

काही दिवसांपूर्वीच एससी, एसटी आरक्षणांतर्गत उपवर्गीकरणावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले होते. या निकालाला विरोध करणारे चिराग पासवान हे पहिले केंद्रीय मंत्री ठरले होते. याआधीही त्यांनी वक्फ सुधारित अधिनियमालाही सभागृहातून बाहेर जात अप्रत्यक्ष विरोध केला होता. यूपीएससीकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परीक्षेविना भरतीच्या निर्णयावरही ते नाराज होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT