CJI Surya Kant Remark : बेरोजगार तरुणांना झुरळ संबोधल्यानंतर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर टीका व्हायला लागल्यानंतर देशाचे सरन्यायाधीश सुर्य कांत यांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे. आपल्यावरील आरोप हे तथ्यहीन असून आपण बेरोजगार तरुणांवर कुठल्याही प्रकारची टीका केलेली नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी आपण नेमकं काय म्हटलं होतं आणि त्याचा विपर्यास कसा केला गेला हे देखील सांगितलं आहे.
सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांचा समावेश असलेल्या खंडपीठासमोर, एका वकिलाला 'वरिष्ठ वकील' (Senior Advocate) म्हणून दर्जा देण्याशी संबंधित एका याचिकेवर सुनावणी सुरू असताना, सरन्यायाधीशांनी केलेल्या काही टिप्पणींमुळं हा वाद निर्माण झाला. सुनावणीदरम्यान, खंडपीठाने याचिकाकर्त्या वकिलाला 'वरिष्ठ वकील' दर्जा मिळवण्यासाठी त्याने चालवलेल्या अति-आग्रही पाठपुराव्याबद्दल फटकारलं. तसंच, फेसबुकवर त्यानं कथितरित्या वापरलेली भाषा आणि एकूणच त्याचं वर्तन यावरही खंडपीठाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. यावेळी खंडपीठानं संबंधित याचिकाकर्त्याला फटकारताना म्हटलं की, "संपूर्ण जग कदाचित 'वरिष्ठ वकील' होण्यास पात्र असेल; परंतु, निदान तुम्ही तरी त्यास पात्र नक्कीच नाही,"
अशा प्रकारच्या आग्रहामुळं व्यथित झालेले सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी यावर टिप्पणी करताना म्हटलं की, जर दिल्ली हायकोर्टानं या याचिकाकर्त्याला 'वरिष्ठ वकील' म्हणून दर्जा दिलाच, तर त्याच्या व्यावसायिक वर्तनाचा विचार करून सुप्रीम कोर्ट तो दर्जा रद्द करेल. त्यानंतर संबंधित वकिलाच्या सोशल मीडियावरील भाषेचा संदर्भ देताना सरन्यायाधिश म्हणाले की, "समाजात आधीच असे काही 'परजीवी' (parasites) अस्तित्वात आहेत, जे व्यवस्थेवर टीका करतात आणि तुम्हाला आता त्यांच्याच पंक्तीत जाऊन बसायचे आहे का?" त्यांनी पुढे असंही म्हटलं की, "काही तरुण हे झुरळांसारखे (cockroaches) असतात, त्यांना कुठेही रोजगार मिळत नाही किंवा कोणत्याही व्यवसायात त्यांच्यासाठी जागा नसते. त्यातील काही जण प्रसारमाध्यमांमध्ये शिरकाव करतात, काही सोशल मीडियाचा आधार घेतात, काही 'आरटीआय' (RTI) कार्यकर्ते किंवा इतर प्रकारचे कार्यकर्ते बनतात आणि मग ते प्रत्येकावरच टीका करायला सुरुवात करतात" न्यायालयाच्या या निरीक्षणानंतर, याचिकाकर्त्याने खंडपीठाची माफी मागितली आणि याचिका मागे घेण्याची परवानगी मागितली. सर्वोच्च न्यायालयाने याचिका मागे घेण्याची विनंती मान्य केली. पण तोवर सरन्यायाधिशांची हीच टिप्पणी सर्वत्र व्हायरल झाली आणि त्यामुळं देशभरातील सामाजिक कार्यकर्ते आणि बुद्धिजीवी लोकांकडून सरन्यायाधिशांवर टीकेचा भडीमार सुरु झाला.
आपल्यावर होत असलेल्या टीकेवर स्पष्टीकरण देताना सरन्यायाधीश म्हणाले, "काल एका क्षुल्लक खटल्याच्या सुनावणीदरम्यान मी तोंडी केलेल्या निरीक्षणांचा, प्रसारमाध्यमांच्या एका विशिष्ट वर्गाने कशा प्रकारे विपर्यास केला आहे, हे वाचून मला अत्यंत वेदना झाल्या आहेत. मी ज्यांच्यावर प्रामुख्याने टीका केली होती, ही ती मंडळी होती ज्यांनी बनावट आणि खोट्या पदव्यांच्या आधारे 'बार' (वकिली व्यवसाय) सारख्या व्यवसायांमध्ये प्रवेश मिळवला आहे. अशाच प्रकारची मंडळी प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया आणि इतर प्रतिष्ठित व्यवसायांमध्येही घुसली आहेत. म्हणूनच, ती परजीवींसारखी (parasites) आहेत. त्यामुळं मी सरसकट आपल्या देशातील बेरोजगार तरुणांवर टीका केली, असं म्हणणं हे पूर्णपणे निराधार आहे,"
सरन्यायाधीश पुढे असेही म्हणतात की, आपल्याला देशातील तरुणांचा अभिमान आहे आणि ते त्यांना एका विकसित भारताचे आधारस्तंभ मानतात. "मला केवळ आपल्या वर्तमान आणि भविष्यातील मानवी संसाधनांचाच अभिमान नाही, तर भारतातील प्रत्येक तरुण मला प्रेरणा देतो. भारतीय तरुणांच्या मनात माझ्याबद्दल अत्यंत आदर आणि सन्मान आहे आणि मी देखील त्यांच्याकडे एका विकसित भारताचे आधारस्तंभ म्हणूनच पाहतो,"
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.