Mamata Banerjee Sarkarnama
देश

Mamata Banerjee : ममतादीदींच्या इशाऱ्यानंतर तीन मुख्यमंत्री भडकले; ‘या’ राज्यातही आगडोंब उसळणार?

Himanta Biswa Sarma N Biren Singh Mohan Charan Majhi : विद्यार्थी आंदोलनानंतर भाजपने बुधवारी बंगालमध्ये बंद पुकारला होता. यादरम्यान राज्यात मोठी हिंसा झाली.

Rajanand More

New Delhi : कोलकाता रेप-मर्डर प्रकरणावरून पश्चिम बंगालमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दररोज राज्यातील रस्त्यांवर आंदोलने होत आहेत. भाजपने बुधवारी राज्यव्यापी बंदची हाक दिली होती. यादरम्यान अनेक ठिकाणी हिंसा झाली. त्यावरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भाजपवर चांगल्याच भडकल्या आहेत. त्यांच्या संतापाच्या ठिणग्या इतर राज्यांमध्येही आग लागण्याची भाषा बोलू लागल्या आहेत.

भाजपच्या बंदनंतर ममता बॅनर्जी यांनी केलेल्या विधानांवरून वाद निर्माण झाला आहे. बुधवारी टीएमसीच्या विद्यार्थी संघाच्या परिषदेत बोलताना ममतांनी भाजप नेत्यांवर सडकून टीका केली होती. भाजपने बंगालमध्ये आग लावली तर आसाम, ईसान्य भारत, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा आणि दिल्लीही पेटेल. आम्ही तुम्हाला खुर्चीवर खेचू, असे ममता म्हणाल्या होत्या.

ममतांच्या या विधानानंतर भाजपची सत्ता असलेल्या तीन राज्यांतील मुख्यमंत्र्यांनी लगेचच पलटवार केला. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा म्हणाले, आसामला धमकावण्याची तुमची हिंमत कशी झाली. आमच्यावर डोळे वटारू नका. अपयशी राजकारणातून भारत पेटवण्याची भाषा करू नका. ही भाषा तुम्हाला शोभा देत नाही.

सरमा यांच्या पाठोपाठ मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनीही ममतांवर निशाणा साधला आहे. पुर्वोत्तर राज्यांना धमकावण्याची तुम्ही हिंमत कशी केली, असे बोलत सिंह म्हणाले, मी याचा निषेध करतो. त्यांनी संपूर्ण देशाची माफी मागायला हवी. हिंसा आणि विद्वेष पसरवणे त्यांनी बंद करायला हवे. एखाद्या राजकीय नेत्याने सार्वजनिक व्यासपीठावरून हिंसेची धमकी देणे चुकीचे आहे.

ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझीही भडकले. ओडिशाविषयी अशी आपत्तीजनक भाषा बोलण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? ओडिशा हे एक शांतताप्रिय राज्य आहे. येथील लोक जबाबदार आणि जागरूक आहेत. तुमच्या या भूमिकेचा स्वीकार राज्यातील जनता कधीच करणार नाही, अशी हल्ला माझी यांनी चढवला.

काय म्हणाल्या होत्या ममतादीदी?

विरोधकांवर टीका करताना ममता म्हणाल्या होत्या की, हे बांग्लादेश आहे, मला बांग्लादेशविषयी प्रेम आहे, असे काही लोक सांगतात. त्यांची संस्कृती आपल्यासारखीच आहे. पण बांग्लादेश आणि भारत वेगवेगळे देश आहेत. मोदी बाबू, ही आग बंगालमध्ये पसरावी, असे तुम्हाला वाटते का? तुम्ही हे समजून घ्यायला हवे की, बंगालमध्ये आग लागली तर आसामही वाचणार नाही. बिहार, मणिपूर किंवा ओडिशापर्यंत मर्यादित राहणार नाही. ही आग दिल्लीपर्यंत पोहचेल, असा सूचक इशारा मतांनी दिला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT