Sarkarnama
देश

Cockroach Janata Party latest update : 'कॉकरोच जनता पार्टी'चा सोशल मीडियावर धुमाकूळ! कोट्यवधींचा टप्पा पार करत भाजपलाही टाकले मागे; 5 दिवसांत फॉलोअर्सचा पाऊस

Cockroach Janata Party followers growth : 'कॉकरोच जनता पार्टी' सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून अवघ्या 5 दिवसांत कोट्यवधी फॉलोअर्स मिळवत चर्चेचा विषय ठरली आहे. भाजपलाही फॉलोअर्सच्या शर्यतीत मागे टाकल्याची चर्चा रंगली आहे.

Rashmi Mane

सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या कथित ‘कॉकरोच’ वक्तव्यानंतर सोशल मीडियावर सुरू झालेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. अवघ्या 5 दिवसांत या पेजने सोशल मीडियावर कोट्यवधींचा टप्पा पार करत अनेक मोठ्या राजकीय पक्षांनाही मागे टाकल्याचे दिसून आले आहे. गुरुवारी सकाळपर्यंत इन्स्टाग्रामवर या पेजचे 1 कोटींपेक्षा अधिक फॉलोअर्स झाले होते, तर ट्विटरवरही जवळपास 1,60,000 लोकांनी या मोहिमेला पाठिंबा दिला आहे.

विशेष म्हणजे, इन्स्टाग्रामवर भाजपचे सुमारे 87 लाख फॉलोअर्स आहेत, तर काँग्रेसचे 1.32 कोटी फॉलोअर्स आहेत. त्यामुळे ‘कॉकरोच जनता पार्टी’ची वाढ सोशल मीडियावर चर्चेचा मोठा विषय ठरली आहे.

या मोहिमेची सुरुवात अभिजीत दीपके यांनी केली आहे. ‘धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाहीवादी आणि आळशी’ असे हटके घोषवाक्य घेऊन त्यांनी या पेजची निर्मिती केली. सुरूवातीच्या काही तासांतच लाखो तरुणांनी या मोहिमेला प्रतिसाद दिला आणि एका दिवसातच 40 लाखांहून अधिक फॉलोअर्स वाढल्याचा दावा करण्यात आला.

सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी एका सुनावणीदरम्यान बेरोजगार तरुणांची तुलना झुरळांशी केल्याचा आरोप सोशल मीडियावर करण्यात आला होता. त्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या. मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांनी आपण असे कोणतेही वक्तव्य केले नसल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, ‘कॉकरोच जनता पार्टी’ने स्वतःचा जाहीरनामाही प्रसिद्ध केला आहे. पक्ष सदस्यत्वासाठी बेरोजगारी, आळस, सतत ऑनलाइन राहण्याची सवय आणि भावना व्यक्त करण्याची क्षमता अशा चार अटी ठेवण्यात आल्या आहेत.

पक्षाने काही वेगळ्या आश्वासनांचीदेखील घोषणा केली आहे. यामध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण, पक्षांतर करणाऱ्या आमदार-खासदारांवर 20 वर्षांची बंदी, तसेच माध्यम संस्थांबाबत कठोर धोरण यांचा समावेश आहे.

अभिजीत दीपके सध्या अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये पब्लिक रिलेशन्सचे शिक्षण घेत आहेत. त्यांनी याआधी 2020 ते 2023 दरम्यान आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया टीममध्ये सद्स्य म्हणून काम केले होते. सोशल मीडियावर व्यक्त झालेल्या तरुणांच्या भावना पाहूनच ‘CJP’ची कल्पना सुचल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT