

Pune News : पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम हा अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यापूर्वीच जाहीर करण्यात आला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला तरीही अद्याप या विधान परिषद निवडणुकीसाठीची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली नसल्याचा आरोप पुणे जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी जिल्हा प्रशासनाच्या आयोजित बैठकीत बोलताना केला.
ऐनवेळी मतदार यादीत पुणे जिल्ह्यातील रद्द करण्यात आलेल्या कटक मंडळाच्या म्हणजेच कॅन्टोन्मेंट बोर्डच्या मुदत संपलेल्या नगरसेवकांना व महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांना घुसविण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता असल्याचा आरोपही विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी केला आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी मंगळवारी मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यासाठी शहर व जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघ निवडणुकीच्या मतदार यादीबाबत राजकीय पक्षांकडून विविध सवाल उपस्थित करण्यात आले.
या बैठकीला पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर आणि निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम उपस्थित होत्या. मात्र, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी हे अनुपस्थित असल्याने या प्रश्नांची उत्तरे मिळू शकली नसल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, या बैठकीत मतदार याद्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाची माहिती, आयोगाने जाहीर केलेले वेळापत्रक आणि पुणे जिल्ह्यातील तयारीचा आढावा घेण्यात आला.
या बैठकीत बोलताना विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघ निवडणुकीच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध नसतानाच निवडणूक कार्यक्रम कसा जाहीर झाला?, स्वीकृत नगरसेवकांचा मतदार यादीत समावेश करणार का? आणि पुणे जिल्हा कटक मंडळे रद्द झाली असताना आणि त्या सर्व मंडळाच्या नगरसेवकांची मुदत संपली असताना त्यांचा मतदार यादीत कसा काय समावेश करणार? आदी प्रश्न उपस्थित केले.
मात्र, याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागविण्यात येणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी या बैठकीत बोलताना सांगितल्याचे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी सांगितले. 25 तारखेला नॉमिनेशन दाखल करण्याच्या पूर्वी ही मतदार यादी अंतिम होणार असल्याचे सांगितले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.