Maharashtrawadi Gomantak Party  Sarkarnama
देश

एक्झिट पोलनंतर 'मगोप'चा भाव वाढला; भाजपसह काँग्रेसनं टाकला गळ

एक्झिट पोलमध्ये (Exit Polls) गोव्यात एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचा कल आला आहे.

सरकारनामा ब्युरो

पणजी : एक्झिट पोलमध्ये (Exit Polls) गोव्यात एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचा कल आला आहे. यानंतर भाजप (BJP) आणि काँग्रेसकडून (Congress) जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. एक्झिट पोलनंतर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा (MGP) भाव अचानक वाढला आहे. भाजप आणि काँग्रेस नेत्यांनी मगोपसाठी गळ टाकण्यास सुरवात केली आहे. यामुळे गोव्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्हे आहेत.

ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेससोबत मगोपने विधानसभा निवडणुकीपूर्वी आघाडी केली होती. आता मगोप हाच किंगमेकर ठरेल, असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तर भाजपचे केंद्रीय नेतृत्व मगोपच्या संपर्कात असल्याचे जाहीर केले आहे. सावंत म्हणाले, भाजपला 20 पेक्षा जास्त जागा मिळतील. बहुतेक एक्झिट पोलमध्ये भाजप जिंकत असल्याचे दिसत आहे. आम्ही अपक्ष आणि प्रादेशिक पक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करू. केंद्रीय नेत्यांकडून त्यांच्याशी त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा सुरू आहे. गरज भासल्यास मगोपचीही मदत घेऊ.

याचवेळी काँग्रेसनेही मगोपशी संधान साधण्यात सुरवात केली आहे. काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव (Dinesh Gundu Rao) यांनी म्हटलं आहे की, जो पक्ष भाजपच्या विरोधात असेल त्या पक्षाशी आम्ही संपर्क साधणार आहोत. मी कोणत्याही एका पक्षाबद्दल बोलत नाही. परंतु जो पक्ष भाजपला पाठिंबा देऊ इच्छित नाही, त्यांना आम्ही सोबत घेण्यास तयार आहोत. निवडणुकीतील प्रचारादरम्यान आप (AAP) आणि टीएमसीने (TMC) आमच्यावर विविध प्रकारचे आरोप केले. परंतु निकालानंतर आम्ही कोणासोबत जायचे याबाबत लवकरच निर्णय घेवू. भाजपला पाठिंबा न देणाऱ्या पक्षांसोबत आम्हाला काम करायचे आहे. याशिवाय तृणमूल काँग्रेससोबत आघाडी केलेला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षही काँग्रेसच्या संपर्कात आहे.

मगोपचं वेट अँड वॉच

मगोपने आघाडीचे पर्याय खुले असल्याची भूमिका घेतली आहे. काँग्रेस आणि भाजपनेही आमच्याशी संपर्क साधला, असेही पक्षाने स्पष्ट केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मगोप आणि तृणमूलची उद्या बैठक होणार आहे. निकालानंतर कोणाशी आघाडी करायची याचा निर्णय या बैठकीत होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर तृणमूलशी चर्चा करून मगोप अंतिम निर्णय घेणार आहे.

त्रिशंकू स्थितीची अंदाज

एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, गोव्यामध्ये त्रिशंकू स्थिती होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे पारडं जड असल्याचे काही पोल्समध्ये दिसून येत आहे. त्यामुळे काँग्रेसने हालचाली सुरु केल्या आहेत. भाजपविरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन करत काँग्रेस गोव्यात आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) आणि तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress Party) सोबत युती करण्यास तयार आहे, अशी घोषणा केली आहे. मागील विधानसभा निवडणुकीच्या निकालांनतर काँग्रेसच्या तोंडचा घास भाजपने हिरावला होता. त्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT