New Delhi : भाजप आणि काँग्रेसच्या सरकारची तुलना करण्यासाठी भाजप संसदेत ‘व्हाइट पेपर’ आणणार आहे. त्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली. या ‘व्हाइट पेपर’साठी केंद्र सरकार संसदेचे कामकाज एक दिवसाने वाढविणार आहे. भाजपने ‘व्हाइट पेपर’ आणण्यापूर्वी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ‘ब्लॅक पेपर’ आणत भाजपच्या ‘400 पार’ या घोषणेची अनोखी पोलखोल केली आहे.
खर्गे यांनी थेट भाजपने 411 आमदारांना फोडत विविध राज्यांतील काँग्रेस व इतर भाजप विरोधातील सरकार पाडल्याचा आरोप केला. वेगवेगळ्या राज्यांतील हे आमदार कसे फोडले? हे लोकांना चांगले माहीत असल्याचे खर्गे म्हणाले.
मुळात काँग्रेसचा ‘ब्लॅक पेपर’ हा तीन विषयांवर ‘फोकस’ करून काढण्यात आला आहे. बेरोजगारी, महागाई आणि उपेक्षित शेतकरी या विषयांवर ‘फोकस’ करत काँग्रेसने ‘ब्लॅक पेपर’ काढला आहे. भाजप नेहमी त्यांच्या यशाचे गुणगान गाते, पण ते त्यांच्या पराभवाबद्दल बोलत नाही. ‘ब्लॅक पेपर’ भाजप सरकारच्या विरोधात काढल्याचा दावा मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे. ‘ब्लॅक पेपर’मध्ये बेरोजगारी हा सर्वांत मोठा मुद्दा आहे. भाजपच्या अपयशाबद्दल जेव्हा बोलतो, तेव्हा त्याला जास्त महत्त्व दिले जात नाही. काँग्रेसने ‘व्हाइट पेपर’ येण्यापूर्वी केवळ ‘ब्लॅक पेपर’ काढल्याचे पोस्टर दाखविले.
‘ब्लॅक पेपर’मधील परिपूर्ण माहिती आम्ही नंतर देऊ असे खर्गे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे काँग्रेसच्या ‘ब्लॅक पेपर’मध्ये नेमके काय.? असा प्रश्न आता विचारला जाणार आहे. बेरोजगारी हा देशातील सर्वांत मोठा मुद्दा आहे. भाजप याविषयी बोलत नाही. ग्रामीण भागात ‘मनरेगा’चे पैसे दिले जात नसल्याचे चित्र आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळमध्ये पैसा दिला जात नसल्याचे उदाहरण खर्गे यांनी दिले. भाजपचे राज्यपाल हे ‘डिक्टेटर’ आहे, असा आरोप खर्गे यांनी केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सगळे जण काँग्रेसला शिव्या देता त्या द्या, पण महागाई नियंत्रित करण्याची गरज होती. ते केले गेले नाही असे खर्गे म्हणाले. अत्यावश्यक वस्तूंची महागाई नियंत्रित केली नाही. केंद्र सरकारने शेतकऱ्यांची चिंता केली नाही. तीन काळे कायदे आणत ते परत घेतले. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू असे म्हणाले, पण केले नाही. एमएसपी वाढविली जात नाही. या विषयांवर मोदी काहीच बोलत नाहीत, असे ते म्हणाले.
एमएसपी गॅरेंटीचे काय? दोन कोटी नोकरी देण्याच्या गॅरेंटीचे काय? सामाजिक न्यायाचे काय? असा प्रश्न खर्गे यांनी विचारला. मोदींच्या हिंदीच्या कुशल वक्तृत्व शैलीने परिस्थिती बदलत नाही, असे खर्गे म्हणाले. ‘इलेक्ट्रोल बॉन्ड’च्या माध्यमातून उद्योजकांकडून पैसे जमा करण्यात येत आहेत. देशातील विविध राज्यांतील 411 आमदारांना त्यांनी भाजपकडे घेतले. मध्य प्रदेश, कर्नाटक, मणिपूर, गोवा, उत्तराखंड या ठिकाणचे सरकारे बदलली. हे उदाहरण देताना खर्गे हे महाराष्ट्राचा उल्लेख करणे विसरले.
झारखंड येथे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. तिथे आम्ही सरकार केले. काँग्रेस नेत्यांना घेऊन भाजप सरकार स्थापन करते आणि दुसरीकडे नेहरू तसेच इंदिरा गांधी यांच्या विरोधात भाषणे केली जातात, असा दावा खर्गे यांनी केला. मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदींनी ‘टॅक्स कलेक्शन’बाबत केंद्र सरकारला धारेवर धरले होते, आता इतर राज्य ‘टॅक्स कलेक्शन’चा त्यांचा हिस्सा मागतात, त्यात काय चूक आहे, असा प्रश्न खर्गेंनी केला.
भाजपच्या ‘व्हाइट पेपर’पूर्वी काँग्रेसने ‘ब्लॅक पेपर’ आणत ‘ब्लॅक अॅण्ड व्हाइट पॉलिटिक्स’ सुरू केल्याचे चित्र होते. लोकसभा निवडणुकीच्या काळात यापेक्षा अधिक आक्रमक दोन्ही पक्ष असतील, याची चिन्हं निर्माण झाली आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.