Mumbai : मुंबई काँग्रेसला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. मुंबईतील मोठे नेते, माजी खासदार मिलिंद देवरा ( Milind Deora ) यांनी जानेवारी महिन्यात काँग्रेसचा 'हात' सोडत शिवसेनचं 'धनुष्यबाण' हाती घेतलं होतं. आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाबा सिद्दिकी ( Baba Siddique ) यांनी गुरूवारी ( 8 फेब्रुवारी ) पक्षाचा राजीनामा दिला आहे. लवकरच ते अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी होणार आहेत. सिद्दिकींच्या राजीनाम्यानं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षवर नाराजी?
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि नाना पटोलेंमध्ये ( Nana Patole ) अंतर्गत वाद असल्याचं सर्वश्रूत आहे. ते वाद वारंवार दिसूनही आले आहेत. नाना यांच्या कार्यपद्धतीवर पक्षातील अनेकांनी सवाल उपस्थित केला आहे. एकवेळ पत्रकार परिषदेत नाना पटोले बोलत असताना, विरोधी पक्षनेते चक्क उठून गेले होते. यातूनही त्यांच्यातील वाद समोर आला होता.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
चेन्नीथालांकडून नाराजी व्यक्त
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथाला हे जानेवारीत महाराष्ट्र दौऱ्यावर होते. या दौऱ्यावर असताना देखील त्यांनी पक्षातील अंतर्गत नाराजीवर भाष्य केलं होत. काँग्रेस पक्षाअंतर्गत नाराजी बाहेर येता कामा नये आणि माध्यमांशी संवाद साधताना सावधगिरी बाळगा, असे आदेश त्यांनी दिले होते. मात्र, तरीदेखील परिस्थिती न सुधारल्यामुळे त्यांनी थेट दिल्लीत या सगळ्यांचा दाखला दिला आणि नाराजी व्यक्त करत महाराष्ट्र काँग्रेसमध्ये एका ठाम नेतृत्वाची गरज असल्याचं सांगितलं होतं.
काँग्रेसमध्ये नेतृत्व नसल्याने नेते सोडून जातात
काँग्रेस पक्षात गळतीला सुरुवात झाली आहे. आधी मिलिंद देवरा आणि आता बाबा सिद्दिकी यांनीही काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यामुळे नेतृत्व या नेत्यांना टिकवून ठेवण्यात अपयशी ठरलं का? असा सवाल उपस्थित झाला आहे.
काँग्रेसमधील एका आमदारानं 'सरकारना'माशी संवाद साधताना अनेक नेते सोडून जाणार असल्याची भीती व्यक्त केली होती. "पूर्वी काँग्रेसमध्ये ही परिस्थिती नव्हती. पण, आता नेतृत्व ठाम नसल्यानं ही परिस्थिती पक्षावर आली आहे. नेतृत्व खंबीर असेल, तर पक्षात एकजूट राहिल. ही फक्त सुरूवात आहे. पुढे अजून नेते पक्ष सोडून जातील," असं दावा आमदाराने केला होता.
राज्यसभेत काँग्रेसला अजून धक्का बसण्याची शक्यता
आगामी राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटल्यानं चंद्रकात हंडोरे यांना पराभव सहन करावा लागला होता. याची चौकशी करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती. पण, अद्यापही कुठलीही कारवाई केली गेली नाही. त्यामुळे काँग्रेसच्या कारभारावर प्रश्न उपस्थित झाले होते. आता अशीच परिस्थिती राज्यसभेच्या बाबतीत देखील होणार असल्याची चर्चा आहे.
( Edited By : Akshay Sabale )
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.