Rahul Gandhi and Bharat Jodo Yatra Sarkarnama
देश

Manipur to Mumbai : निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेस काढणार ‘न्याय यात्रा’

Rajanand More

Bharat Nyay Yatra : ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेस 'भारत न्याय यात्रा' काढणार आहे. ही यात्रा 'भारत जोडो यात्रे'चा दुसरा टप्पा असून मणिपूर ते मुंबई असा या यात्रेचा मार्ग असणार आहे. याच कालावधीत लोकसभा निवडणुकीबाबत 'इंडिया' आघाडीच्या महत्त्वाच्या बैठका, सभा नियोजित असणार आहेत. त्यामुळे या यात्रेमुळे 'इंडिया' आघाडीला ‘न्याय’ मिळू शकेल का, असाही सवाल उपस्थित होत आहे.

काँग्रेसचे (Congress) महासचिव के. सी. वेणुगोपाल (KC Venugopal) आणि ज्येष्ठ नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी माध्यमांना याबाबत माहिती दिली. 'भारत जोडो यात्रा' (Bharat Jodo Yatra) ही दक्षिण ते उत्तर अशी होती. ही यात्रा 12 राज्यांतून गेली. राहुल गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीर असा सुमारे साडेचार हजार किलोमीटर प्रवास केला. 'भारत न्याय यात्रा' त्याचा दुसरा टप्पा असल्याचे वेणुगोपाल यांनी सांगितले.

इंफाळ येथून 14 जानेवारीला ही यात्रा सुरू होणार असून 20 मार्च रोजी मुंबईत दाखल होणार आहे. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील. पक्षाचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) या यात्रेत तब्बल 6 हजार 200 किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. ही यात्रा 14 राज्यांतील 85 जिल्ह्यांतून जाणार आहे. बहुतेक प्रवास बसमधून असेल. ठिकठिकाणी पदयात्राही काढल्या जाणार असल्याचे वेणुगोपाल यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मणिपूरमधून यात्रेला सुरूवात झाल्यानंतर पुढे नागालॅंड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांचा समावेश असेल. 'भारत जोडो यात्रे'प्रमाणेच ही यात्रा ऐतिहासिक ठरेल, असा विश्वास वेणुगोपाल यांनी व्यक्त केला. तसेच या यात्रेचा निवडणुकीच्या तयारीवर किंवा 'इंडिया' आघाडीच्या बैठकांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सामाजिक ध्रुवीकरण, आर्थिक विषमता असे मुद्दे घेऊन राहुल गांधींनी 'भारत जोडो यात्रे'त आपले विचार मांडले. ही 'मन की बात' नव्हती, तर लोकांचे ऐकण्यासाठी ही यात्रा होती. आर्थिक, सामाजिक व राजकीय न्यायासाठी भारत न्याय यात्रा आहे. आधी 'भारत जोडो यात्रा' आणि आता 'भारत न्याय यात्रा'. लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस वचनबध्द असल्याचा विश्वास राहुल गांधी या यात्रेतून देशातील लोकांना देतील, असे जयराम रमेश यांनी सांगितले.

Edited by Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT