BJP and Congress
BJP and Congress  Sarkarnama
देश

आघाडीचे सरकार पाडण्यासाठी काँग्रेसच्या माजी केंद्रीय मंत्र्याची भाजपशी छुपी युती!

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : झारखंडमधील काँग्रेस (Congress) आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार पाडण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री आर. पी. एन. सिंह (R. P. N. Singh) यांनी मागील वर्षभरापासून भाजपसोबत (BJP) छुपी युती केली होती, असा गौप्यस्फोट काँग्रेसच्या नेत्यानेच केला आहे. सिंह यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला असून, मागील वर्षभरापासून ते भाजपच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. सिंह हे काँग्रेसचे झारखंडमध्ये प्रभारी होते.

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या (UP Election 2022) तोंडावर सिंह यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सिंह यांच्यावर काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची आणि झारखंडच्या प्रभारीपदाची जबाबदारी होती. सिंह यांच्या रुपाने काँग्रेसच्या यंग ब्रिगेडमधील आणखी एक मोहरा गळाला आहे. दरम्यान, सिंह यांनी काँग्रेस सोडताच त्यांच्या गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत. राज्यातील सरकार पाडण्यासाठी त्यांनी भाजपशी छुपी युती केल्याचा खळबळजनक दावा काँग्रेसच्या नेत्यानेच केला आहे.

काँग्रेसच्या आमदार अंबा प्रसाद यांनी हा दावा केला आहे. पक्ष नेतृत्वाला याबद्दल अनेक वेळा धोक्याचा इशारा देण्यात आला होता. आता सिंह हे काँग्रेस सोडून गेल्याने झारखंडमधील सगळे सच्चे काँग्रेस कार्यकर्ते आनंदात आहेत, असे प्रसाद यांनी म्हटले आहे. सिंह यांच्यावर आरोप करणाऱ्या प्रसाद या एकमेव नेत्या नाहीत. इतर नेत्यांनीही असाच आरोप केला आहे. सिंह हे पक्षाला कमकुवत करीत होते. त्यांच्या निर्णयांचा फायदा काँग्रेसऐवजी भाजपला झाला आहे, असे नेत्यांनी म्हटले आहे.

काँग्रेस नुकतीच तीस जणांची स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत माजी केंद्रीय मंत्री सिंह यांचाही समावेश करण्यात आला होता. पण लगेचच त्यांनी पक्षाला रामराम ठोकला होता. भाजपने स्टार प्रचारकालाच गळाला लावल्याने राजकीय वातावरण तापले आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसला हा मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे. सिंह हे काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री होते. सिंह यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पत्र लिहून राजीनामा दिला होता. (RPN Singh joins BJP)

सिंह हे भाजपमध्ये दाखल झाले असून, त्यांचा सामना भाजपमधून समाजवादी पक्षात गेलेले मातब्बर ओबीसी नेते स्वामीप्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांच्याशी होण्याची शक्यता आहे. यामुळे या लढतीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ते पडरौना मतदारसंघातून मैदानात उतरतील, असे मानले जात आहे. या मतदारसंघात मौर्य हे विद्यमान आमदार आहेत. मौर्य यांच्या विरोधात लढण्यासाठी बलाढ्य नेत्याचा शोध भाजपकडून सुरू होता. अखेर सिंह यांच्या रुपाने हा नेता मिळाला आहे. सिंह आणि मौर्य या दोघांनीही या मतदारसंघातून विजयाची हॅटट्रिक नोंदवली आहे. (RPN Singh News Updates)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT