Simi Rosebell John Sarkarnama
देश

Simi Rosebell John : काँग्रेसमध्ये घमासान; ‘कास्टिंग काऊच’चा आरोप करणाऱ्या महिला नेत्याची हकालपट्टी

Casting Couch in Congress Kerala Congress K Sathisan : सिमी रोझबेल जॉन यांनी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

Rajanand More

New Delhi : कास्टिंग काऊचचा आरोप झाल्यानंतर केरळ काँग्रेसमध्ये सध्या घमासान सुरू आहे. पक्षाच्या नेत्या सिमी रोझबेल जॉन यांनी केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली.. त्यानंतर काही तासांतच त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षात नेत्यांना खूष करणाऱ्या महिलांनाच पुढे जाण्याची संधी मिळत असल्याचे त्यांनी म्हटले होते.

मल्याळम चित्रपटसृष्टीत लैंगिक छळाच्या आरोपांनी रान उठले आहे. त्याचे वारे आता राजकारणातही वाहू लागले आहे. जॉन यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीनंतर राजकारणातील कास्टिंग काऊचचा मुद्दा समोर आला. त्यानंतर रविवारी रात्री केरळ काँग्रेस प्रदेश कमिटीने पत्रक प्रसिध्द करून जॉन यांच्या बडतर्फीची माहिती दिली.

पत्रकात म्हटले आहे की, जॉन यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. त्यांनी पक्षातील महिला नेत्यांचा मीडियासमोर अपमान केला. रोझबेल यांचे आरोप पक्षातील लाखो महिला नेत्या व कार्यकर्त्यांचा मानसिक छळ करणे आणि त्यांना बदनाम करण्याच्या उद्देशाने केलेले आहेत.

दरम्यान, पक्षातून बडतर्फ केल्यानंतर रोझबेल यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, आत्मसन्मान असलेली महिला अशा पक्षात काम करू शकत नाही. माझ्यावर केलेल्या आरोपांबाबत त्यांच्याकडे पुरावे असतील तर समोर आणावेत.

काय आहे प्रकरण?

सिमी रोझबेल जॉन यांनी शनिवारी पक्षातील नेत्यांवर कास्टिंग काऊचचे आरोप केले होते. चित्रपटसृष्टीप्रमाणेच राजकारणातही कास्टिंग काऊच होत असल्याचे त्यांनी म्हटले होते.  जॉन यांच्या या आरोपांनंतर केरळ महिला काँग्रेसने त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली आहे.

जॉन यांनी थेट विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतिशन यांच्यावर निशाणा साधला होता. मी त्यांच्या गुड बुकमध्ये जाऊ शकले नाही, कारण मी त्यांना खूश करू शकले नाही, असा गंभीर आरोप जॉन यांनी केला आहे. केरळ काँग्रेसमधील किती महिलांना समस्यांना तोंड द्यावे लागले, असा सवालही जॉन यांनी उपस्थित केला आहे. ज्यांनी आदेशाचे पालन केले नाही त्यांना चांगली वागणूक मिळत नाही तर इतरांना पक्ष नेतृत्वाकडून सन्मान मिळतो, असा दावा जॉन यांनी केला आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि इतर नेत्यांचा पाठिंबा असताना सतिशन यांनी आपला संधी नाकारली. मी पक्षासाठी जेवढे काम केले त्याचीशी सतीशन यांनी केलेल्या कामासोबत तुलनाही होऊ शकत नाही, असे जॉन यांनी म्हटले आहे. त्यांनी इतर काही महिलांना दिलेल्या पदांवर आक्षेप घेत सतिशन यांच्यावर आरोप केले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT