Sharad Pawar and Mamata Banerjee
Sharad Pawar and Mamata Banerjee  Sarkarnama
देश

पवारांच्या भेटीनंतर ममतांची काँग्रेस वगळून आघाडी अन् वेणूगोपाल म्हणाले, शक्यच नाही!

सरकारनामा ब्युरो

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banarjee) यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. या भेटीनंतर शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांनी माध्यमांशी संवाद साधला. विशेष म्हणजे या भेटीनंतर ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला (Congress) वगळून देशात तिसऱ्या आघाडीचे संकेत दिले आहेत. याला आता काँग्रेसचे सरचिटणीस के.सी.वेणूगोपाल यांनी उत्तर दिले आहे.

ममता बॅनर्जी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून अनेक चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणाच्‍या दृष्‍टीने ममतांनी शरद पवारांची भेट घेणे महत्‍वाची मानले जात आहे. या भेटीनंतर ममतांनी काँग्रेस वगळून तिसऱ्या आघाडीचे सूतोवाच केले. यावर काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काँग्रेस नेते के.सी.वेणूगोपाल म्हणाले की, वेणूगोपाल म्हणाले की, भारतीय राजकारणातील वास्तव सगळ्यांना माहिती आहे. काँग्रेसला वगळून भाजपचा पराभव करता येईल, असे तुम्हाला वाटत असेल तर ते केवळ स्वप्नच राहील.

पवारांशी भेट झाल्यानंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या की, केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात मोठी आघाडी तयार करण्यासाठी देशभरातील विरोधी पक्ष एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. फॅसिस्टवादाच्या विरोधात समविचारी पक्षांनी एकत्र येणे ही आता काळाची गरज बनली आहे. त्यासाठी भाजपच्या विरोधात लढण्यासाठी देशभरात विरोधी पक्षांची मोठी ताकद तयार केली आहे. भाजपच्या विरोधात लढण्यासाठी देशभरातील जे विरोधी पक्ष एकत्र येतील त्या सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे.

काँग्रेसला वगळून ही आघाडी करणार का, असे विचारले असता ममता बॅनर्जी म्हणाल्या की, देशाच्या जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी भाजपच्या विरोधात ही लढाई सुरु केली जाणार आहे. आता संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) वगैरे काही नाही. सोबत येतील त्या सर्वांना आम्ही सोबत घेऊन जाणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने देशाला वेगळा पर्याय देणे गरजेचे असल्याचे शरद पवारांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत ठीक नसल्यामुळे ममतांची त्यांच्याशी भेट होऊ शकली नाही. पण त्यांचे पुत्र व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी त्यांची भेट झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT