Satish Jarkiholi Sarkarnama
देश

Congress Leader News : गाडीची स्मशानभूमीत पूजा...२०२३ क्रमांक अन्‌ कर्नाटकात सत्ता : काँग्रेसच्या बड्या नेत्याचा संकल्प अखेर पूर्ण

राज्यात २०२३ मध्ये काँग्रेस पक्ष सत्तेत आणण्याचा संकल्प करून वाहन व क्रमांक घेतल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले होते.

सरकारनामा ब्यूरो

बेळगाव : कर्नाटक (Karnataka) विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यानंतर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांचे ‘ते’ वाहन चर्चेत आले आहे. जारकीहोळी यांनी २०२० मध्ये एक चारचाकी वाहन खरेदी केले होते. त्या वाहनाचा क्रमांक केए ४९ एन २०२३ असा आहे. सन २०२३ मध्ये विधानसभा निवडणूक जिंकण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून नवे वाहन व २०२३ असा क्रमांक घेतल्याचे त्यावेळी जारकीहोळी यांनी जाहीर केले होते. शिवाय स्वगृही किंवा कोणत्याही धार्मिक स्थळावर न जाता सदाशिवनगर स्मशानभूमीतून त्यांनी या नव्या वाहनाचा वापर सुरू केला होता. (Congress leader Satish Jarkiholi's dream of power has finally come true)

सतीश जारकीहोळी ( Satish Jarkiholi) यांनी वाहन खरेदी केल्यानंतर ते आधी सदाशिवनगर येथील स्मशानभूमीत नेले होते. तेथून त्या वाहनाचा वापर जारकीहोळी यांनी सुरू केला होता. त्यावेळी वाहन क्रमांकाबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना विचारणा केली होती.

राज्यात २०२३ मध्ये काँग्रेस पक्ष (Congress) सत्तेत आणण्याचा संकल्प करून वाहन व क्रमांक घेतल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. त्यांचा हा संकल्प पूर्ण झाला आहे. काँग्रेस पक्ष पूर्ण बहुमत घेऊन सत्तेत आला आहे. त्यामुळे जारकीहोळी यांचे ते वाहन पुन्हा चर्चेत आले आहे. जारकीहोळी यांनी स्मशानभूमीत कार्यक्रम करून वाहनाचा वापर सुरू केल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ व विरोधातही अनेकांनी वक्तव्ये केली होती. त्यामुळे जारकीहोळी यांचे ते वाहन कर्नाटक राज्यात चर्चेचा विषय बनले होते.

कर्नाटकात २०१८ मध्ये काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाले नाही. पण, पुढील निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पुन्हा सत्तेत आणण्याचा संकल्प राज्यातील प्रमुख नेत्यांनी केला होता. त्यात जारकीहोळी यांचाही समावेश होता. शिवाय २०१८ च्या निवडणुकीनंतर पक्षाने जारकीहोळी यांच्याकडे प्रदेश कार्याध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारीही दिली. त्यामुळे राज्यभर फिरून त्यांनी पक्ष संघटन मजबूत केली.

स्मशानभूमीत राहून अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम

गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्‍वर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज व महात्मा जोतिराव फुले यांच्या विचारांची समाजात पेरणी करण्याचे काम जारकीहोळी यांच्याकडून केले जाते. यासाठीच त्यानी बुद्ध, बसव, आंबेडकर घरोघरी अशी मोहीम २०२२ मध्ये हाती घेतली होती. याच मोहिमेदरम्यान निपाणी येथे झालेल्या सभेतील त्यांच्या एका वक्तव्यामुळे ते चर्चेत आले होते. त्यांच्या वक्तव्याविरोधात त्यावेळी भारतीय जनता पक्षाने आंदोलन केले होते. पण, त्यानंतरही जारकीहोळी यांनी भूमिका सोडली नाही. दरवर्षी ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनी एक दिवस येथील सदाशिवनगर स्मशानभूमीत ते वास्तव्य करतात. त्या माध्यमातून अंधश्रद्धा दूर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT