मुंबई : कर्नाटकच्या निकालानंतर शरद पवार यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्यात लोकसभेच्या जागावाटपावर चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यानंतर मतदारसंघाची आणि इच्छुकांच्या नावाची चर्चाही रंगू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांना आता खासदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत. तशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली आहे. (Amol Mitkari wants to contest the Lok Sabha elections from Akola)
महाविकास आघाडीने आपल्याला संधी दिली तर आपण अकोल्यातून लोकसभेची निवडणूक लढवू, असे विधान आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केले आहे. पक्षाने संधी दिली तर जनतेतून पैसा उभा करेन आणि त्याद्वारे लोकसभेची निवडणूक लढविण्यात येईल, असेही मिटकरी यांनी म्हटले आहे. त्याबाबतचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.
‘सिल्व्हर ओक’वर झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत तीनही पक्षांनी प्रत्येकी १६ जागा लढवाव्यात, असा प्रस्ताव काँग्रेसकडून मांडण्यात आल्याची चर्चा आहे. तीनही पक्षांनी समसमान जागा लढवून महाआघाडी एक असल्याचा संदेश द्यावा, असे काँग्रेसचे म्हणणे होते. पण, ती प्राथमिक स्वरुपाची चर्चा असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीच्या सोबत घेण्याबाबत अजून कुठलीही चर्चा अथवा बैठक झालेली नाही. प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आघाडीवर आहेत. मात्र, त्यांना जागा कुठल्या द्यायच्या याबाबत विचार झालेला नाही. विशेषतः राष्ट्रवादी (NCP) ही आंबेडकरांना सोबत घेण्यास फारशी उत्सुक दिसलेली नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा प्रश्न अद्याप तरी सुटलेला नाही.
वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीसोबत घेतले तर प्रकाश आंबेडकर यांना अकोला हा मतदारसंघ सोडवा लागण्याची चिन्हे आहेत. असे असताना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलेली इच्छा महत्वाची आहे. मिटकरी यांना भाजपचे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांच्याशी दोन हात करावे लागणार आहेत. संजय धोत्रे हे २००४ पासून अकोल्याचे खासदार आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी ॲण्टी इनकमबन्शी तयार होण्याची शक्यता आहे, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न आमदार मिटकरी यांचा असणार आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.