AAP, BJP and Congress
AAP, BJP and Congress Sarkarnama
देश

भाजप अन् आपकडून ऑफर; मुख्यमंत्रिपदासाठी लॉबिंग करणाऱ्या काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : काँग्रेसचे (Congress) सत्ता असलेल्या छत्तीसगडमध्ये पक्षात सर्वकाही आलबेल असल्याची स्थिती नाही. मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) आणि आरोग्यमंत्री टी. एस. देव (T. S. Deo) यांच्यात मागील काही महिन्यांत अनेकदा मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच झाल्याचे समोर आले होते. अनेकदा झालेल्या दिल्लीवारीनंतर पक्षाला त्यावर तोडगा काढता आला, असं सांगितलं जातं. पण आता देव यांना भाजपसह (BJP) आपनेही आपल्याकडे खेचण्यासाठी ऑफर दिल्याचे समोर आले आहे.

काँग्रेसचे मुख्यमंत्री असलेल्या दोन राज्यांपैकी छत्तीसगड (Chattisgarh) हे एक राज्य आहे. या राज्यात पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक (Assembly Election) होणार आहे. 2018 च्या निवडणुकीत काँग्रेसनं एकहाती सत्ता मिळविली होती. त्यानंतर मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत चार नेते होते. त्यामध्ये बघेल व देव यांचाही समावेश होता. पण पक्षश्रेष्ठींनी बघेल यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकली. तर देव यांना आरोग्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागले.

मागील वर्षी देव मुख्यमंत्रिपदासाठी अधिक आग्रही असल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे बघेल व देव यांच्या अनेक दिल्लीवाऱ्या झाल्या. पण त्यांना शांत करण्यात पक्षाला यश आले. आता एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. देव यांना थेट भाजप व आपने पक्षात येण्यासाठी प्रयत्न केल्याचे स्पष्ट झालं आहे. देव यांनीच हा गौप्यस्फोट केला आहे. तसेच त्यांनी काँग्रेस सोडणार नसल्याचेही स्पष्ट केलं आहे.

या राजकीय चर्चांबाबत बोलताना देव म्हणाले, विचारधारेमुळे मी भाजपमध्ये प्रवेश करणार नाही. माझ्या पाच पिढ्या काँग्रेसमध्ये आहेत. मी पक्ष सोडणार नाही. काँग्रेस सोडून इतर पक्षांचा विचार करणंही मला अवघड आहे, असंही त्यांनी सांगितलं. आम आदमी पक्षाकडूनही (AAP) आपल्याशी संपर्क साधल्याचे देव यांनी स्पष्ट केलं. पण काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्यास नकार दिल्याचा दावा देव यांनी केला आहे.

मी अरविंद केजरीवाल यांना भेटलो नाही. पण हे खरं आहे की, राजकारणात अनेक लोकं आहेत, जी एकमेकांच्या संपर्कात असतात. त्यामुळं माझ्याशी कुणीच संपर्क साधला नाही, असं नाही. पण मी त्यांना काँग्रेसमधील माझ्या पिढ्यांविषयी सांगितलं आणि तिचं परंपरा पुढेही सुरूच राहील, असंही स्पष्ट केल्याचे देव यांनी नमूद केलं. दरम्यान, देव यांनी काँग्रेस सोडण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला असला तरी तरी त्यांची मुख्यमंत्रिपदाची इच्छा लपून राहिलेली नाही. त्यामुळे पुढीलवर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT