Congress News : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच भाजपप्रमाणेच काँग्रेसने ३९ उमदेवारांची पहिली यादी जाहीर केली. या काँग्रेस उमेदवाराच्या पहिल्या यादीत काँग्रेसने दक्षिण भारतावर फोकस केल्याचे दिसत आहे. दुसरीकडे उमदेवार जाहीर करताना काँग्रेसने भाजपप्रमाणे महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केले आहे. या यादीत महाराष्ट्रातील एकही उमेदवार जाहीर केला नसल्याने सर्वांचे लक्ष दुसऱ्या यादीकडे असणार आहे.
काँग्रेसने शुक्रवारी सायंकाळी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत ३९ जणांच्या नावाचा समावेश आहे. त्यामध्ये छत्तीसगडमधून सहा, कर्नाटकातून आठ, तेलंगणामधून चार तर केरळमधून सोळा, मेघालय दोन, सिक्कीम दोन, त्रिपुरा एक, नागालँड एक, लक्षदीप एक या प्रमाणे सर्व उमेदवार जाहीर केले. या यादीमुळे काँग्रेसने दक्षिण भारतावरच येत्या काळात सर्वाधिक लक्ष केंद्रित केले आहे.
दुसरीकडे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा सुरु आहे. अद्याप जागावाटप फायनल झाले नसल्याने महाराष्ट्रातील एकही उमेदवार जाहीर केला नाही. त्यामुळे राज्यातील उमेदवाराची घोषणा होण्यासाठी आता सर्वांचे लक्ष दुसऱ्या यादीकडे असणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
लोकसभा उमेदवारांच्या पहिल्या यादीत भाजपने (Bjp) महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश केला नाही. यंदा भाजपला महाराष्ट्रात ४५ पेक्षा अधिक जागा हव्या आहेत. मात्र शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जास्त उमेदवार निवडून येण्याबाबत साशंकता आहे. त्यामुळे त्यांचे काही उमेदवार ‘कमळ’ चिन्हावर लढवण्याचाही भाजपचा प्रस्ताव आहे. मात्र तो दोघांना अमान्य. त्यासोबतच या वाटाघाटीत राज्यात महायुतीचे जागावाटप अडकले आहे. त्यामुळे भाजपने राज्यातील उमेदवार जाहीर केले नाहीत.
दुसरीकडे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे जागावाटप रखडले आहे. काँग्रेस (Congress), शिवसेना ठाकरे गट (Shivsena) व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वाट्याला किती जागा येणार हे फायनल झाल्यानंतर काँग्रेस उमेदवारांची घोषणा करण्यात येणार आहे.