Rahul Gandhi Sarkarnama
देश

Rahul Gandhi : "नेत्यांनी पक्षापेक्षा…" हरियाणात काँग्रेसचा पराभव का झाला? राहुल गांधींनी सांगितलं कारण

Jagdish Patil

Delhi News, 10 Oct : हरियाणा (Haryana) विधानसभा निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला. तर इथले वातावरण अनुकूल असतानाही काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे काँग्रेस 'हायकमांड'मध्ये प्रचंड नाराजी आहे.

याच पार्श्वभूमीवर हरियाणातील पराभवाची कारणे नेमकी काय? याचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी एक बैठक पार पडली.

या बैठकीला राहुल गांधी (Rahul Gandhi), मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्यासह इतर महत्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीत राहुल गांधी यांनी स्थानिक नेत्यांवर तीव्र नाराजी दर्शवली. हरियाणातील नेत्यांनी पक्षाच्या हितापेक्षा स्वत:च्या हिताला प्राधान्य दिल्यामुळे काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आणि पक्ष मागे पडलं, अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

पराभवाची कारणे शोधण्यासाठी समिती

तर हरियाणातील (Haryana) पराभवाची कारणे शोधण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येणार असून ही समिती राज्यभरातील नेत्यांशी चर्चा करून त्याचा अहवाल हायकमांडला सादर करणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. मात्र या समितीमध्ये कोणाचा समावेश असणार याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही.

दरम्यान, जवळपास अर्धा तास चाललेल्या या बैठकीनंतर काँग्रेस नेते अजय माकन यांना माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुड्डा आणि खासदार कुमारी शैलजा यांच्यातील वादावर प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, "बैठकीत आम्ही पराभवाच्या कारणांवर चर्चा केली. पराभवाची वेगवेगळी कारणं आहेत.

ती केवळ निवडणूक आयोग आणि नेत्यांमधील वादापुरती मर्यादित नाहीत. त्यामुळे आम्ही सर्व कारणांचा विचार करू आणि याबाबतची चर्चा पुढेही सुरू ठेवू. तसेच आताच कोणताही निष्कर्ष काढता येणार नाही. आज आम्ही भविष्यातील रणनीतीवरही चर्चा केली."

आजच्या बैठकीला हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुड्डा आणि प्रदेशाध्यक्ष उदयभान यांना बोलावण्यात आलं होतं. मात्र ते या बैठकीला गैरहजर राहिले. तर कुमारी शैलजा आणि राज्यसभा खासदार रणदीप सुरजेवाला यांना बैठकीचं आमंत्रण दिलं नसल्याची माहिती आहे.

तर हरियाणातील काँग्रेस नेत्यांमधील या वादाचाच फटका पक्षाला मोठ्या प्रमाणात बसल्याचं दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेस हरियाणातील नेतृत्वात नेमके काय बदल करणार आणि नेत्यांमधील वाद कसे मिटवणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT