T. N. Prathapan
T. N. Prathapan Sarkarnama
देश

काँग्रेसच्या शिबीरानंतर काही तासांतच बड्या नेत्यानं पद सोडलं; 'तो' ठराव कारणीभूत ठरला

सरकारनामा ब्युरो

उदयपूर : राजस्थानातील उदयपूरमध्ये रविवारी काँग्रेसच्या तीन दिवसीय 'नव संकल्प चिंतन शिबीरा'चा समारोप झाला. 'एक व्यक्ती एक पद' आणि 'एक कुटुंब एक तिकीट' या धोरणांसह अन्य काही महत्वाचे निर्णयही शिबीरात घेण्यात आले. त्यामध्ये पाच वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच पदावर कोणत्याही पदाधिकाऱ्याला राहता येणार नाही, हाही निर्णय आहे. (Congress Chintan Shivir Latest Marathi News)

पाच वर्ष एकाच पदावर राहिलेल्या नेत्याला पुन्हा या पदावर नियुक्तीसाठी तीन वर्षे थांबावे लागणार आहे. म्हणजे पुढील तीन वर्षांनीच पुन्हा संबंधित पद मिळू शकते. त्यामुळे पाच वर्षानंतर संबंधित नेत्याला पायउतार व्हावे लागणार आहे. त्याची अंमलबजावणी करत एका बड्या नेत्यानं आपल्या पदाचा ठरावानंतर काही तासांतच राजीनामा दिला आहे. (Congress MP T. N. Prathapan resigns)

अखिल भारतीय मच्छीमार काँग्रेसचे अध्यक्ष टी. एन. प्रतापन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांची 2017 मध्ये या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. ते केरळमधून पक्षाचे खासदारही आहेत. त्यांनी सोमवारी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून राजीनामा स्वीकारण्याची विनंती केली आहे.

मी या पदावर पाच वर्षांपासून आहे. उदयपूर येथील शिबीरातील ठरावानुसार मी राजीनामा देत आहे. ही माझीही शिफारस होती. हा खूप महत्वाचा आणि चांगला निर्णय पक्षाने घेतला आहे. यापूढे पक्ष मला जी जबाबदारी देईल, ती प्रामाणिकपणे पार पाडेन. पक्षाने मला खूप दिले आहे. त्याची भरपाई करण्यासाठी मी तयार आहे, असं प्रतापन यांनी पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, शिबीरात 'एक परिवार एक तिकीट' च्या महत्वाच्या प्रस्तावावरही शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. नेत्याच्या कुटुंबातील दुसऱ्या सदस्याला तिकीट हवे असेल तर त्याने पक्षात किमान पाच वर्षे काम केलेले असावे, ही अट कायम ठेवण्यात आली आहे. यातून गांधी कुटुंबाचा मार्ग मोकळा करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे.

50 वर्षांखालील नेत्यांसाठी 50 टक्के पदं

पक्षात तरूणांना अधिकाधिक संधी मिळावी यासाठी 50 वर्षांखालील नेत्यांना 50 टक्के पदांवर नियुक्ती दिली जाणार असल्याचा महत्वपूर्ण ठरावही शिबीरात करण्यात आला आहे. मागील काही वर्षांत पक्षात तरूणांना संधी मिळत नसल्याचा आरोप अनेक तरूण नेत्यांनी केला होता. त्यातून काही नेते पक्षातूनही बाहेर पडले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT