Mallikarjun Kharge Sarkarnama
देश

Mallikarjun Kharge : खर्गेंनी नेत्यांचे कान उपटले; महाराष्ट्रात काँग्रेसची 'गॅरंटी' नाही?

Maharashtra Congress Leadership Kharge Remarks: कर्नाटकात काँग्रेसने पाच आश्वासने दिली होती. पण त्यांची पुर्तता करणे सरकारच्या नाकीनऊ येऊ लागले आहे.

Rajanand More

Mumbai News: निवडणुकीआधी पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या जातात. पण सत्ता आल्यानंतर त्याची अंमबजवाणी करताना राज्य कधी दिवाळखोरीत निघेल, याची शाश्वती नसते. हिमाचल प्रदेश त्याचे ताजे उदाहरण असून आता कर्नाटकही त्याच रांगेत आहे. त्यावरून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी आपल्याच सरकारचे कान उपटले आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा काँग्रेसचा जाहीरनामा पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पुढील आठवड्यात प्रसिध्द केला जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी झालेल्या काही राज्यांच्या निवडणुकीवेळी काँग्रेसने विविध आश्वासने दिली होती. तशीच गॅरंटी यावेळी महाराष्ट्रातही पाहायला मिळणार का, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

जाहीरनाम्यावर चर्चेसाठी खर्गे यांनी नुकतीच कर्नाटक काँग्रेसमधील नेत्यांची भेट घेतली. त्यांच्याशी बोलताना खर्गे म्हणाले की, महाराष्ट्रातही पाच गॅरंटीचे आश्वासन दिले जाणार आहे. पण तुम्ही तुमच्या राज्यातील गॅरंटी बंद करणार असल्याचे मी वृत्तपत्रात वाटले. मी महाराष्ट्रातील नेत्यांना सांगितले हे की, 5, 6, 10, 20 गॅरंटी अशी आश्वासने देऊ नका. राज्याच्या आर्थिक कुवतीप्रमाणेच आश्वासने द्या.

बजेट नसताना आश्वासने दिली तर राज्य दिवाळखोरीकडे घेऊन जाल. रस्त्यावर माती टाकायलाही पैसे उरणार नाही. सरकारने आश्वासने पूर्ण केली नाहीत तर त्याचा परिणाम पुढे भोगावा लागेल. त्यामुळे अंथरून पाहून पाय पसरण्याचा सल्ला खर्गे यांनी कर्नाटक सरकारला दिला. एकप्रकारे महाराष्ट्र काँग्रेससाठीही हा सूचक इशारा मानला जात आहे.

दरम्यान, महाराष्ट्राच्या निवडणुकीतही लाडकी बहीण इतर योजनांवरून जोरदार वादविवाद सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह अनेकांनी त्यावर सरकारला घेरले आहे. काँग्रेससह इतर विरोधी पक्षही सरकारने मतांसाठी महिलांना पैशांचे वाटप केल्याचा आरोप केला जात आहे. तर दुसरीकडे याच योजनेची रक्कम सतेत आल्यानंतर वाढवू, अशी आश्वासने नेत्यांकडून दिली जात आहेत.

हिमाचल आणि कर्नाटकच्या निवडणुकीआधी काँग्रेसने पाच गॅरंटी देत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता. आता खर्गे यांनी नेत्यांना परिस्थितीची जाणीव करून दिल्यानंतर महाराष्ट्रात काँग्रेसचे गॅरंटी कार्ड चालणार का, आश्वासनांची खैरात केली जाणार का, हे जाहीरनामा प्रसिध्द झाल्यानंतरच समोर येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT