Congress Video Controversy : काँग्रेसच्या 'व्होट बचाव, देश बचाव' रॅलीदरम्यानचा एक व्हिडिओ सध्या पक्षांतर्गत चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडिओमध्ये रामटेकचे काँग्रेस खासदार श्याम कुमार बर्वे हे चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांना चापट मारताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकारावरून काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला असून, संबंधित खासदारावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 1 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून 'व्होट बचाव, देश बचाव' रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीसाठी काँग्रेसचे अनेक खासदार बसमधून प्रवास करत होते. याच प्रवासादरम्यानचा सुमारे दहा सेकंदांचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये श्याम कुमार बर्वे हे प्रतिभा धानोरकर यांच्या शेजारी उभे राहून त्यांच्या गालावर हलकी चापट मारताना दिसतात. या घटनेनंतर धानोरकर त्यांच्याकडे रागाने पाहत असल्याचेही व्हिडिओत दिसते.
या व्हिडिओची पक्षाच्या वर्तुळात चर्चा सुरू झाल्यानंतर काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी थेट पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्याची माहिती आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, सोनिया गांधी, संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि महाराष्ट्राचे पक्षप्रभारी सिरीवेला प्रसाद यांना ईमेलद्वारे ही तक्रार पाठवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
महिला खासदाराच्या सन्मानाचा मुद्दा उपस्थित
पक्षश्रेष्ठींना पाठवलेल्या तक्रारीत या घटनेबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. लोकशाही, संविधान आणि महिलांच्या सन्मानासाठी लढा देणाऱ्या काँग्रेस पक्षातील लोकप्रतिनिधीकडून अशा प्रकारचे वर्तन अपेक्षित नसल्याचे तक्रारीत नमूद केल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसू शकतो आणि जनतेमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो, अशी चिंताही व्यक्त करण्यात आली आहे.
त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी. महिला लोकप्रतिनिधींचा सन्मान आणि पक्षातील शिस्त कायम राखण्यासाठी संबंधित खासदारावर योग्य ती अनुशासनात्मक कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे. मात्र, या प्रकरणात प्रतिभा धानोरकर यांनी वेगळी भूमिका मांडली आहे.
त्यांनी या व्हिडिओबाबत कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला. हा प्रकार खासदारांमधील आपापसातील थट्टामस्करीतून घडल्याचे त्यांनी म्हटल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता या तक्रारीची काँग्रेसचे राष्ट्रीय नेतृत्व कितपत दखल घेते आणि श्याम कुमार बर्वे यांच्याबाबत काही कारवाई केली जाते का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.