

Youth Congress Suspended 60 Leaders : निवडणूक आयोगाच्या 'एसआयआर' कार्यक्रमावरून केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभाराविरोधात पुकारलेल्या इंडिया आघाडीच्या रॅलीला, आंदोलनाला गर्दीवरून सोशल मीडियावर 'काँट्राव्हर्सी' सुरू असतानाच, युवा काँग्रेसने रॅलीला अनुपस्थित राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईचा बडगा सुरू केला आहे.
मध्य प्रदेशमधील युवा काँग्रेसमधील साठ पदाधिऱ्यांवर निबंलनाची कारवाई करत एकाच वेळी बाहेर रस्ता दाखवण्यात आला आहे. या कारवाईमुळे देशभरातली युवा काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अशीच कारवाईची शक्यता महाराष्ट्रातील युवा काँग्रेसमध्ये वर्तवली जात असल्याचे काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
इंडिया आघाडीने एक नोव्हेंबरला दिल्ली रामलीला मैदानावर केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभाराविरोधात रोष व्यक्त करण्यासाठी, कारवाई करण्यासाठी रॅलीचे आयोजन केले होते. देशभरातील इंडिया आघाडीत असलेले प्रमुख पक्ष या रॅलीत सहभागी झाले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी रॅलीचे नेतृत्व केले.
या रॅलीतील गर्दीवरून सोशल मीडियावर 'काँट्राव्हर्सी' अद्याप सुरू आहे. परंतु रॅलीतील गर्दीमुळे केंद्रातील भाजप (BJP), एनडीए प्रणित सत्ताधाऱ्यांच्या आगामी काळातील राजकीय गणितांना धक्का बसला असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. सत्ताधारी भाजप या गणितात गुंतलेला असतानाच, काँग्रेसच्या युवा संघटनेत वेगळ्याच हालचाली झाल्याचे समोर आले आहे.
दिल्लीतील रामलीला मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या 'व्होट चोरी' रॅलीला उपस्थित न राहणाऱ्या मध्य प्रदेशमधील युवा काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. संघटनेने शिस्तभंगाचा ठपका ठेवत सुमारे साठ पदाधिकाऱ्यांना एकाच वेळी निलंबित केले. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये प्रदेश उपाध्यक्ष, सरचिटणीस, सचिव आणि जिल्हाध्यक्ष स्तरावरील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
एक नोव्हेंबरला दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेसच्या वतीने 'व्होट बचाओ, देश बचाओ' रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला उपस्थित राहण्याचे निर्देश युवा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. मात्र, निर्देश देऊनही अनेक पदाधिकारी या रॅलीला उपस्थित राहिले नाहीत.
पदाधिकाऱ्यांच्या या गैरहजेरीची संघटनेने गांभीर्याने घेत, त्यांच्यावर एकाचवेळी निलंबनाची कारवाई केली. संघटनेच्या आदेशांचे पालन न करणे आणि संघटनात्मक शिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत हे निलंबन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मध्य प्रदेश युवा काँग्रेस संघटनेत करण्यात आलेल्या कारवाईमुळे देशभरातील युवा काँग्रेस संघटनेत खळबळ उडाली आहे.
या कारवाईचे देशभरातील राज्यात पडसाद उमटणार अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्रातून या रॅलीत तब्बल पाच हजारांवर पदाधिकारी सहभागी झाले होते. त्यात युवा काँग्रेसचे देखील पदाधिकारी होते. काही जण गैरहजर होते. त्यांच्यावर देखील अशी कारवाई होणार असल्याचे संकेत काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांने दिले. महाराष्ट्रात नेमकी काय कारवाई होते, याकडे आता लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.