US Election Results : डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का; अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीच्या निकालांमध्ये रिपब्लिकन्सची पिछेहाट

US Midterm Elections 2026 : अमेरिकेच्या सिनेटमधील १०० पैकी ३५ जागांसाठी यंदा निवडणूक झाली. या निवडणुकीपूर्वी सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचे ५३, तर डेमोक्रॅटिक पक्षाचे ४५ सदस्य होते. दोन अपक्ष सदस्य डेमोक्रॅट्ससोबत मतदान करतात. त्यामुळे सिनेटवरील नियंत्रण मिळवण्यासाठी डेमोक्रॅट्सना किमान चार जागांची निव्वळ वाढ आवश्यक आहे.
US Midterm Elections 2026 | Trump Faces Setback
US Midterm Elections 2026 | Trump Faces SetbackSarkarnama
Published on: 
Updated on: 

US Midterm Elections 2026 : अमेरिकेच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या २०२६ च्या मध्यावधी निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असून, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला सुरुवातीच्या निकालांमध्ये मोठा धक्का बसताना दिसत आहे. अमेरिकन काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांवरील वर्चस्व कायम राखण्याचे रिपब्लिकन पक्षाचे आव्हान वाढले आहे.

दुसरीकडे, डेमोक्रॅटिक पक्षाने सिनेटमधील महत्त्वाच्या जागा जिंकत आपली ताकद दाखवून दिली आहे. विशेष म्हणजे, रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या उत्तर कॅरोलिनामध्ये डेमोक्रॅटिक उमेदवार रॉय कूपर यांनी विजय मिळवला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या दोन वर्षांच्या कामगिरीवर जनतेने दिलेला कौल म्हणून या निवडणुकांकडे पाहिले जात आहे. त्यामुळे या निकालांचा परिणाम केवळ अमेरिकेच्या संसदेतील सत्तासमीकरणांवरच नव्हे, तर ट्रम्प यांच्या उर्वरित दोन वर्षांच्या राजकीय कारभारावरही होणार आहे.

सिनेटमध्ये डेमोक्रॅट्सची मोठी मुसंडी

अमेरिकेच्या सिनेटमधील १०० पैकी ३५ जागांसाठी यंदा निवडणूक झाली. या निवडणुकीपूर्वी सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचे ५३, तर डेमोक्रॅटिक पक्षाचे ४५ सदस्य होते. दोन अपक्ष सदस्य डेमोक्रॅट्ससोबत मतदान करतात. त्यामुळे सिनेटवरील नियंत्रण मिळवण्यासाठी डेमोक्रॅट्सना किमान चार जागांची निव्वळ वाढ आवश्यक आहे.

सुरुवातीच्या निकालांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाने महत्त्वाच्या जागांवर विजय मिळवला आहे. उत्तर कॅरोलिनामध्ये माजी गव्हर्नर रॉय कूपर यांनी रिपब्लिकन उमेदवार मायकेल व्हॉटली यांचा पराभव केला. या विजयामुळे डेमोक्रॅट्सनी रिपब्लिकन पक्षाकडील एक महत्त्वाची सिनेटची जागा हिसकावून घेतली आहे. २००८ नंतर या राज्यातून डेमोक्रॅटिक पक्षाचा सिनेटमध्ये प्रवेश होणार आहे.

जॉर्जियामध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे विद्यमान सिनेटर जॉन ओसॉफ यांनी रिपब्लिकन उमेदवाराचा पराभव करत आपली जागा कायम राखली आहे. न्यू हॅम्पशायरमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे ख्रिस पप्पास यांनी रिपब्लिकन उमेदवार आणि माजी सिनेटर जॉन सुनुनू यांचा पराभव केला आहे. या विजयामुळे डेमोक्रॅट्सनी आपली महत्त्वाची जागा कायम राखली आहे.

याशिवाय इलिनॉयमध्ये जुलिआना स्ट्रॅटन यांनी विजय मिळवला आहे. व्हर्जिनियामध्ये मार्क वॉर्नर, मॅसॅच्युसेट्समध्ये एड मार्की, न्यू जर्सीमध्ये कॉरी बुकर आणि डेलावेअरमध्ये ख्रिस कून्स यांनी पुन्हा विजय मिळवत सिनेटमधील आपले स्थान कायम राखले आहे. या निकालांमुळे सिनेटमधील सत्तासमीकरण बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, सर्व ३५ जागांचे निकाल अद्याप स्पष्ट झालेले नसल्याने सिनेटवरील नियंत्रणाबाबत अंतिम चित्र समोर येणे बाकी आहे.

US Midterm Elections 2026 | Trump Faces Setback
India Alliance Rally : रॅलीला दांडी मारणाऱ्या 60 पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसने 'करेक्ट कार्यक्रम' केला! महाराष्ट्रातही निलंबनाचा बडगा?

प्रतिनिधीगृहातही ट्रम्प यांची कसोटी

अमेरिकेच्या संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या प्रतिनिधीगृहाच्या सर्व ४३५ जागांसाठी निवडणूक झाली आहे. या सभागृहात बहुमतासाठी २१८ जागांची आवश्यकता असते. निवडणुकीपूर्वी रिपब्लिकन पक्षाकडे २१८, तर डेमोक्रॅटिक पक्षाकडे २१२ जागा होत्या. डेमोक्रॅटिक पक्षाने यंदा प्रतिनिधीगृहात बहुमत मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत.

सुरुवातीच्या निवडणूक कलांमध्ये डेमोक्रॅट्सची कामगिरी समाधानकारक दिसत असून, काही महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये त्यांनी रिपब्लिकन उमेदवारांना मागे टाकले आहे. त्यामुळे प्रतिनिधीगृहावरील रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. मात्र, सर्व मतदारसंघांची मतमोजणी पूर्ण झालेली नसल्याने प्रतिनिधीगृहात कोणत्या पक्षाला बहुमत मिळणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही.

ट्रम्प यांच्या कारभारावरील जनतेचा कौल

अमेरिकेत दर चार वर्षांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होते. मात्र, या निवडणुकीच्या मधल्या काळात होणाऱ्या निवडणुकांना मध्यावधी निवडणूक (Midterm Elections) म्हटले जाते. या निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष निवडला जात नाही. तर काँग्रेसच्या प्रतिनिधीगृहातील सर्व जागा आणि सिनेटमधील साधारण एक तृतीयांश जागांसाठी मतदान होते.

US Midterm Elections 2026 | Trump Faces Setback
Supreme Court: नुकसान झालेल्या दिल्लीतील व्यापाऱ्यांच्या तक्रारीवर सुप्रीम कोर्टाची महत्वाची टिप्पणी; आंदोलकांना फटकारलं

राष्ट्राध्यक्षांच्या पक्षाची लोकप्रियता, सरकारची धोरणे आणि कामगिरी यांची या निवडणुकीत परीक्षा होते. त्यामुळे ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या दोन वर्षांच्या कारभाराबाबत अमेरिकन मतदारांमध्ये किती नाराजी आहे, याचे संकेत या निकालांमधून मिळत आहेत. या निवडणुकीत महागाई, इंधनाचे वाढते दर, अर्थव्यवस्था, इराणसोबतचे युद्ध आणि ट्रम्प प्रशासनाच्या धोरणांवरून मतदारांमध्ये नाराजी असल्याचे निवडणूकपूर्व सर्वेक्षणांमधून समोर आले होते.

ट्रम्प यांच्या उर्वरित कार्यकाळासाठी मोठे आव्हान

या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाने प्रतिनिधीगृह किंवा सिनेट यापैकी कोणत्याही एका सभागृहात बहुमत मिळवले, तरी ट्रम्प यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय आव्हान उभे राहू शकते. कारण अमेरिकेच्या संसदेतील दोन्ही सभागृहांमध्ये बहुमत असणे राष्ट्राध्यक्षांसाठी महत्त्वाचे असते. डेमोक्रॅट्सना प्रतिनिधीगृहात बहुमत मिळाल्यास ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयांची चौकशी करण्याचा आणि सरकारच्या धोरणांना विरोध करण्याचा मार्ग मोकळा होईल. त्यामुळे २०२६ च्या मध्यावधी निवडणुकीचे निकाल ट्रम्प यांच्या उर्वरित कार्यकाळासाठी निर्णायक ठरणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.