Priyanka Gandhi Sarkarnama
देश

Priyanka Gandhi In CWC : काँग्रेसची 'टीम २०२४' लवकरच; प्रियांका गांधींना मिळणार मोठी जबाबदारी

Sunil Balasaheb Dhumal

Priyanka Gandhi May Play Key Role In CWC : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची निवड होऊन आठ महिने उलटले आहेत. मात्र अद्यापही नवी काँग्रेस कार्यकारी समिती (CWC) जाहीर करण्यात आलेली नाही. आता लवकरच पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी 'टीम २०२४' जाहीर करणार आहे. यात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. (Latest Political News)

भारत जोडो यात्रा, संसदीय अधिवेशन आणि कर्नाटक निवडणुकांमुळे कार्यकारणी समिती निवडीला उशीर झाल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात येते. आता काँग्रेसने अधिवेशनात ठरविल्यानुसार अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे नव्या कार्यकारी समितीत सदस्यांना समावून घेण्याची शक्यता आहे. लोकसभा २०२४ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच काँग्रेस सक्षम नेत्यांची टीम जाहीर होणार आहे. या कार्यकारिणी समितीत प्रियांका गांधी-वाड्रा यांनाही मोठी जबाबदारी देण्याची शक्यता आहे.

प्रियांका गांधींची भूमिका काय ?

काँग्रेसच्या नव्या कार्यकारी समितीत प्रियांका गांधी-वाड्रा यांना कोणती जबाबदारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता त्यांना पक्षात मोठी जबाबदारी देण्याची शक्यता आहे. प्रियांका यांना कुठले पद द्यायचे यावर सध्या काँग्रेसमध्ये खलबते सुरू आहे. त्यांच्यासाठी अनेक पर्यायांचा विचार केला जात आहे. प्रियांकाला सरचिटणीस किंवा कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्त करण्याचीही शक्यता आहे.

प्रियांका गांधी यांनी हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकमधील प्रचाराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आता त्यांच्यावर पक्षासह कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. प्रियांका गांधी या आधीच तेलंगणा आणि मध्य प्रदेश या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रचाराचे नेतृत्व करत आहेत. त्यामुळे निवडणुकीचे प्रभारी सरचिटणीस म्हणूनही त्यांच्यासाठी नवी भूमिका निश्चित होऊ शकते.

सचिन पायलट यांनाही मिळणार जबाबदारी

कर्नाटकच्या मंत्रिमंडळात दिनेश गुंडू राव आणि एच. के. पाटील मंत्री झाले आहेत. त्यामुळे अनुक्रमे तमिळनाडू आणि महाराष्ट्राचे प्रभारी पदे भरणे आवश्यक आहे. राजस्थानमधील निवडणुका लक्षात घेता, सचिन पायलट यांना केंद्रीय संघटनेत, किंवा नवीन कार्यकारी समितीत सदस्य किंवा महाराष्ट्रासारख्या राज्याचे प्रभारी सरचिटणीस असे महत्वाचे पद देण्याची शक्यता आहे. या नियुक्तीने राजस्थानमधील पायलट-गेहलोत संघर्ष कमी करण्याचा खर्गे यांचा प्रयत्न असू शकतो.

अजय माकन यांचा प्रवेश होऊ शकतो

खर्गे यांनी काँग्रेस कार्यकारी समितीतील सदस्यांची संख्या ३५ पर्यंत कमी केली आहे. राज्या-राज्यातील नेत्यांकडून अडचणींचा सामना करणाऱ्या काही प्रभारींनाही बदल्याची शक्यता आहे. के. सी. वेणुगोपाल, रणदीप सिंग सुरजेवाला, सेलजा कुमारी आणि माणिक राव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांना कायम केले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय अजय माकन आणि मोहन प्रकाश यांचाही पुन्हा प्रवेश अपेक्षित आहे.

आठवडाभरात यादी ?

कर्नाटकात पक्षाला नुकतेच मिळालेले यश पाहता उत्सुकता वाढली आहे. आता राज्या-राज्यात होणाऱ्या निवडणुकांसह आगामी लोकसभेत चांगले यश मिळविण्याच्या दृष्टीने ही कार्यकारी समिती महत्वाची ठरणार आहे. खर्गे यांची बहुप्रतीक्षित 'टीम २०२४' यादी आठवडाभरात जाहीर होण्याची शक्यता आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT