India Aghadi  Sarkarnama
देश

India Aghadi Coordinator News : इंडिया आघाडीचा समन्वयक मी होणार नाही; तो मुंबईच्या बैठकीत ठरणार ; नीतिशकुमारांची माहिती

सरकारनामा ब्यूरो

Patana : मला आता काहीही नको आहे. मला काहीही बनायचे नाही. मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत समन्वयक दुसऱ्याला बनविण्यात येणार आहे, अशी माहिती बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी दिली. नीतीशकुमार यांच्या नव्या वक्तव्याने इंडिया आघाडीचे समन्वयक काण होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Coordinator of India Aghadi will be in the Mumbai meeting)

मुंबईत येत्या ३१ ऑगस्टपासून १ सप्टेंबरपर्यंत म्हणजे दोन दिवसांची इंडिया आघाडीतील पक्षांची बैठक होणार आहे. इंडिया आघाडीची मुंबईत तिसरी बैठक होणार आहे. याच बैठकीत इंडिया आघाडीच्या लोगोचेही अनावरण होणार आहे. त्यातच नीतिशकुमार यांच्या विधानामुळे याच बैठकीत समन्वयक घोषित केला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

समन्वयक होण्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री नीतिशकुमार म्हणाले की, आम्हाला काहीही नको आहे. आम्हाला काहीही बनायचे नाही. मुंबईत INDIA आघाडीच्या बैठकीत दुसऱ्या व्यक्तीला बनविण्यात येणार आहे. आम्ही लोकांना एकत्र करत आहोत. सर्वांनी एकत्र यावे आणि त्यांना एका व्यासपीठावर आणावे, अशी आमची इच्छा आहे. सर्वांनी मिळून काहीतरी केले पाहिजे, हेच हवे आहे.

नीतिशकुमार यांच्या नकारनंतर आता इंडिया आघाडीचे समन्वयक कोण होणार याकडे लक्ष लागले आहे. यामध्ये शरद पवार, सीताराम येच्युरी, उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव हे महत्वाचे नेते आहेत. त्यामुळे या आघाडीच्या समन्वयकाची भूमिका कोण स्वीकारणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.

दरम्यान, इंडिया आघाडीच्या मुंबईत होणाऱ्या बैठकीला खासदार सोनिया गांधी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. यापूर्वी पाटण्यात झालेल्या पहिल्या बैठकीला सोनिया गांधी आल्या नव्हत्या. मात्र, बंगळूरमध्ये झालेल्या बैठकीला मात्र त्यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर आता मुंबईतसुद्धा त्या उपस्थित राहणार आहेत, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT