Kolkata News : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक महापुरूषांनी देशातील जातीय भेदभाव संपविण्यासाठी मोठी चळवळ उभी केली. पण इतक्या वर्षांनंतरही या भेदभावाने देशाची पाठ सोडलेली नाही. त्यातही काही आशेचे किरण दिसत असतात. अशीच एक घटना पश्चिम बंगालमध्ये घडली आहे.
एका गावामध्ये मंदिराची निर्मिती झाल्यापासून दलितांना प्रवेश नाकारला जात होता. पण या मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदाच बुधवारी (ता. 12) दलित बांधवांना मंदिराच्या पायऱ्या चढता आल्या. कोलकातापासून 150 किमी अंतरावर असलेल्या वर्धमान जिल्ह्यातील गीधग्राम या गावात हा ऐतिहासिक बदल झाला आहे.
गावातील गिधेश्वर मंदिरात स्थानिक पाच दलितांना बुधवारी मंदिरात प्रवेश देण्यात आला. तगड्या पोलिस बंदोबस्तामध्ये त्यांनी मंदिराच्या 16 पायऱ्या चढल्या. तसेच मंदिरात धार्मिक विधींमध्येही सहभाग घेतला. आता यापुढे दररोज त्यांना मंदिरात प्रवेश करता येणार आहे. हे मंदिर 200 वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते.
गिधग्राम गावामध्ये शिव मंदिर आहे. या मंदिरांमध्ये गावातील दलितांना अनेक वर्षांपासून प्रवेश नाकारला जात होता. मंदिर समितीवर अनेकदा भेदभावाचा आरोप करण्यात आला होता. इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, मंदिरात प्रवेश करणाऱ्या दलित महिला पूजा दास यांनी सांगितले की, आमच्या पूर्वजांना कधीच पूजा-पाठ करता आला नाही. पण आता आम्ही शिक्षित आहोत. काळ बदलला आहे. त्यामुळे आम्ही पोलिस आणि प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली होती.
आज आम्ही आमचा अधिकार प्राप्त करण्यात यशस्वी ठरलो. मंदिराच्या 16 पायऱ्या चढत अनेक वर्षांपासून सुरू असलेला भेदभाव संपला, अशी भावना दास यांनी व्यक्त केली. गावातील दलितांनी भेदभावाबाबत जिल्हा प्रशासनाला पत्र लिहिले होते. त्यानंतर प्रशासनाने याबाबत गावकऱ्यांची बैठक घेत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यात प्रशासनालाही यश आले.
उपविभागीय अधिकारी अहिंसा जैन यांनी सांगितले की, ‘अशाप्रकारच्या भेदभावाला परवानगी दिली जाऊ शकत नाही. त्यासाठी आम्ही बैठका घेतल्या. हा एक संवेदनशील मुद्दा होता. आम्हाला लोकांची समजूत काढण्यात यश आले.’ प्रशासनाकडून स्थानिक नागरिक, मंदिर समिती, आमदार यांची बैठक घेतली होती. या बैठकीनंतर आणखी एक बैठक झाली. त्यामध्ये प्रशासनाकडून गावकऱ्यांची समजूत काढण्यात आली.
(25 वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर 1. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.