Parliament Special Session Sarkarnama
देश

Danish Ali News : लोकसभेत शिवीगाळ करणाऱ्या रमेश विधुरींवर कारवाई करा, अन्यथा राजीनामा देणार; दानिश अली आक्रमक

Parliament Special Session : रमेश बिधुरी यांनी माझ्याबाबत केलेली विधाने रेकॉर्डवर आहेत.

Mangesh Mahale

New Delhi : भाजपचे खासदार रमेश विधुरी यांनी बसपचे खासदार दानिश अली यांच्याबाबत केलेल्या विधानाबाबत राजकारण तापलं आहे. लोकसभेत गुरुवारी चांद्रयान-३ मिशनवरील चर्चेदरम्यान रमेश विधुरी यांनी बसप खासदार दानिश अली यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली.

दानिश अली आक्रमक झाले असून, त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे. रमेश विधुरी यांच्यावर कारवाई न झाल्यास खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचे दानिश अली यांनी सांगितले.

दानिश अली म्हणाले, "संसदेच्या सभागृहात हे पहिल्यांदाच घडले आहे. एका खासदाराने दुसऱ्या खासदारांविषयी असंसदीय भाषेचा वापर केला आहे. त्याचा मला मानसिक धक्का बसला असून, मला झोप येत नाही, मी अस्वस्थ आहे. लोकसभेचे अध्यक्ष या प्रकरणावर कारवाई करतील, असा माझा विश्वास आहे. रमेश विधुरी यांनी माझ्याबाबत केलेली विधाने रेकॉर्डवर आहेत. माझ्या अधिकारांचे रक्षण केले नाही आणि विधुरींवर कारवाई केली नाही, मी खासदारकीचा राजीनामा देईन,"

"रमेश विधुरी यांनी मला मुस्लिम अतिरेकी असे म्हटलं आहे. हा संपूर्ण मुस्लिम समाजाचा अपमान आहे, यामुळे मी खूप दु:खी आहे," असे अली यांनी ओम बिर्ला यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी विधुरी यांच्या विधानांवरून लोकसभेत दिलगिरी व्यक्त केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सूचनेवरून विधुरी यांना भाजपकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली, अशी माहिती एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

भाजपचे खासदार रमेश विधुरी यांनी लोकसभेत बोलताना केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपवर विरोधकांनी जोरदार निशाणा साधला. रमेश विधुरी यांनी दानिश अली यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्द वापरले होते. त्यानंतर लोकसभेच्या कामकाजातून रमेश बिधुडी यांचे वक्तव्य काढून टाकण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विधुरी यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्तावासाठी लोकसभा अध्यक्ष यांना एक नोटीस दिली आहे. तृणमूल काँग्रेसच्या अपूर्वा पोतदार आणि द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांनीही नोटीस दिल्या असल्याची माहिती आहे. यामुळे आता विधुरींविरोधात महिला खासदार चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT