राजधानी दिल्ली जिंकण्यासाठी सगळ्याचं पक्षांनी जोरदार तयारी केली आहे.लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी एकत्र असलेल्या घटक पक्षांनी 'एकला चलोरे'ची भूमिका घेतली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र लढण्यासाठी इंडिया आघाडीतील पक्ष कामाला लागले आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पाठिंबा मिळाला आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री, आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी ममता बॅनर्जी आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचे पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा रणधुमाळी लवकरच सुरु होत आहे. त्यापूर्वी इंडिया आघाडीतील पक्ष एकाकी पडत असल्याचे चित्र आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीचे वारे वाहण्यापूर्वी काँग्रेस आणि आप यांची युती होण्याचे संकेत होते. पण अरविंद केजरीवाल यांनी काही दिवसापूर्वी सोशल मीडिया X वर पोस्ट शेअर करीत वेगळी चूल मांडण्याची भूमिका जाहीर करीत आप स्वबळावर लढण्याचे जाहीर केले. त्यानंतर काँग्रेस आणि आपची युती होण्याच्या सर्व शक्यता संपुष्टात आल्या.
अरविंद केजरीवाल यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर काँग्रेसचे नेते अजय माकन यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करीत केजरीवाल यांना सुनावले. दिल्ली काँग्रेसच्या वतीने अजय माकन यांनी भाजप आणि आम आदमी पार्टीच्या विरोधात 12 कलमी श्वेतपत्रिका जारी केली. "लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टी सोबत युती करणे ही काँग्रेसची चूक होती, जी आता सुधारली पाहिजे," अशा शब्दात माकन यांनी आपसोबत काडीमोड घेतल्याचे सांगितले.
आप आमची विरोधक असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी नुकतेच स्पष्ट केले. अरविंद केजरीवाल जेव्हा निवडणूक लढवतात तेव्हा त्यांच्या स्वत:च्या युक्त्या आणि गणित असते. केजरीवाल आपला पक्ष पुन्हा निवडणुका जिंकणार असा संभ्रम जनतेत पसरवत आहेत, असे ते म्हणाले. गेहलोत यांच्या विधानानंतर केजरीवाल यांनी संताप व्यक्त करीत त्यांच्या विधानाचा समाचार घेतला. ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसची छुपी युती उघड झाली आहे.
ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनीही इंडिया आघाडी ही फक्त लोकसभा निवडणुकीपुरती होती, दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम्ही काँग्रेससोबत नाही. आमचा 'आप'पाठिंबा आहे. दिल्लीत आपची ताकद आहे, असे राऊत म्हणाले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, भाजप आणि आप यांच्या थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय जनता पार्टी आणि आम आदमी पार्टी यांनी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. काँग्रेसने नवी दिल्ली विधानसभेसाठी अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे सुपुत संदीप दीक्षित यांना मैदानात उतरवलं आहे. दिल्लीतील विधानसभेच्या 70 जागांवर 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. 8 फेब्रुवारीला निकाल लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.