New Delhi News : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal News) यांना ईडीने अटक केल्यानंतर आम आदमी पक्षासमोर संकट उभे ठाकले आहे. भाजपने केजरीवालांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे, तर राजीनामा न देण्यावर ते ठाम आहेत. जेलमधून ते सरकार चालवत असल्याचा दावा दिल्ली सरकारमधील मंत्र्यांकडून केला जात आहे. केजरीवालांना दिल्लीकरांची चिंता सतावत असून, आज त्यांनी जेलमधूनच दुसरा आदेश दिल्याचा दावा मंत्र्यांनी केला आहे.
दिल्लीचे (Delhi) आरोग्यमंत्री सौरभ भारद्वाज यांनी केजरीवालांनी दिलेल्या आदेशाची माहिती मीडियाला दिली. ते म्हणाले, दिल्लीतील रुग्णालये आणि मोहल्ला क्लिनिकमधून नागरिकांना मोफत औषधे मिळणे सुरूच राहायला हवे. त्यांच्या आरोग्य तपासण्याही नियमितपणे सुरू राहाव्यात, असे आदेश केजरीवालांनी दिल्याचे भारद्वाज यांनी सांगितले.
ईडीच्या (ED) कोठडीत असल्याने दिल्लीतील नागरिकांच्या समस्या वाढू नयेत, असे केजरीवालांना वाटते. जेलमधून असूनही त्यांना नागरिकांच्या आरोग्याची चिंता आहे. मोहल्ला क्लिनिकमध्ये औषधे नसल्याने ते चिंतित आहेत. त्यामुळे त्यांनी याबाबत आदेश दिला असून, त्यांचा आदेश माझ्यासाठी देवाच्या आदेशाप्रमाणे आहे, असे भारद्वाज म्हणाले. केजरीलांनी जेलमधून पाणीप्रश्नाबाबत पहिला आदेश दिला होता.
दरम्यान, केजरीवालांकडून जेलमधून (Delhi CM Arvind Kejriwal in ED Custody) दिलेल्या पहिल्या आदेशाची चौकशी ईडीकडून केली जात आहे. तुरुंगात राहून केजरीवाल आवश्यक शासकीय आदेशांवर सही करू शकतात का, त्यांचे आदेश पीएमएलए कोर्टाने (PMLA Court) दिलेल्या आदेशाच्या अंतर्गत येतात का, याबाबत ईडीकडून चाचपणी केली जात आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जेलच्या नियमानुसार, त्यांना पेन किंवा पेपर दिला जाऊ शकत नाही. त्यांना केवळ सायंकाळी सहा ते सात यादरम्यान अर्धा तास पत्नी किंवा खासगी सचिवांना भेटता येऊ शकते, तर अर्धा तास ते वकिलांना भेटू शकतात. त्यामुळे त्यांनी जेलमधून आदेश कसा दिला, याबाबत भाजपकडूनही आक्षेप घेण्यात आला आहे.
कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणी (Delhi Liquor Scam) ईडीने केजरीवालांना अटक केली आहे. त्यांना कोर्टाने २८ मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. तुरुंगात जाऊनही राजीनामा न देण्याचा निर्णय केजरीवालांनी घेतला आहे, तर दुसरीकडे त्यांच्या राजीनाम्यासाठी भाजप नेते आक्रमक झाले असून, आज दिल्लीत आंदोलनही करण्यात आले. आप नेतेही रस्त्यावरून उतरून केजरीवालांच्या अटकेचा विरोध करत आहेत.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.