Rajasthan News : राजस्थानमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याविरोधात काँग्रेसने माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या कट्टर समर्थक नेत्यालाच लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) मैदानात उतरवले आहे. काँग्रेसने कोटा लोकसभा मतदारसंघातून प्रल्हाद गुंजल यांना आज उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या लढतीकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. बिर्ला हे सलग दोनदा या मतदारसंघातून विजयी झाले आहेत.
काँग्रेसने (Congress) आज राजस्थानमधील चार मतदारसंघांतील उमेदवारांची घोषणा केली. त्यामध्ये गुंजल यांच्या नावाचाही समावेश आहे. अजमेरमधून रामचंद्र चौधरी, राजसंमदमधून सुदर्शन रावत आणि भिलवाडातून दामोदर गुर्जर यांनी तिकीट देण्यात आले आहे. डूंगरपूर बांसवाडा मतदारसंघ मित्रपक्षाला सोडण्यात आला आहे. काँग्रेसकडून राज्यातील सर्व उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
राजस्थानमध्ये (Rajasthan) लोकसभेच्या 25 जागा असून, काँग्रेसकडून 21 जागांवर उमेदवार उतरवण्यात आले आहे. चार जागा मित्रपक्षाला देण्यात आल्या आहेत, तर भाजपकडूनही (BJP) आजपर्यंत 22 उमेदवार घोषित केले आहेत. अद्याप तीन जागांची घोषणा करण्यात आलेली नाही. मागील निवडणुकीत भाजपने सर्व 25 जागा जिंकल्या होत्या.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कोटामध्ये रंगतदार लढत
कोटामध्ये ओम बिर्ला यांच्यासमोर प्रल्हाद गुंजल यांचे आव्हान असेल. गुंजल हे वसुंधरा राजेंचे विश्वासू नेते मानले जात होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्याआधी चुरूचे लोकसभा खासदार राहुल कंस्वा यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी तिकीटही जाहीर झाले आहे. गुंजल हे गुर्जर समाजाचे मोठे नेते आहेत. त्यांनाच उमेदवारी मिळाल्याने बिर्ला यांच्यासमोर आव्हान वाढल्याचे बोलले जात आहे.
गुंजल हे भाजपच्या तिकिटावर दोनदा आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र, मागील निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर वसुंधरा राजेंकडूनही दुर्लक्ष झाल्याची चर्चा आहे. ते भाजपकडून लोकसभेसाठीही इच्छुक होते. पण पुन्हा बिर्ला यांनाच तिकीट देण्यात आल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत उमेदवारीही मिळवली.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.