India Alliance Rally Sarkarnama
देश

India Alliance News : आधी केजरीवालांचे पोस्टर हटवले, मगच नेते व्यासपीठावर आले!

Rajanand More

New Delhi News : दिल्लीच्या रामलीला मैदानात आज इंडिया आघाडीची (India Alliance News) महारॅली झाली. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आयोजित या रॅलीमध्ये काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी भाजपसह मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. पण रॅलीला सुरूवात होण्यापुर्वी व्यासपीठासमोरच लावण्यात आलेल्या केजरीवालांच्या पोस्टरवरून नाराजीनाट्य रंगल्याचे सांगितले जात आहे.

महारॅलीसाठी भलेमोठे स्टेज उभारण्यात आले होते. स्टेजच्या समोरील बाजूस केजरीवालांचे पोस्टर लावण्यात आले होते. या पोस्टरवर काँग्रेसच्या (Congress) पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतल्याने तो हटवण्यात आल्याची चर्चा आहे. रॅलीला सुरूवात होण्याच्या आधीच हे पोस्टर हटवण्यात आल्याचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. केजरीवाल तुरुंगात असल्याचे चित्र या पोस्टवर होते.

दरम्यान, पोस्टर का हटवले, याबाबत अद्याप आप किंवा इतर कोणत्याही पक्षांकडून स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, काँग्रेसचे नेते व्यासपीठावर इतर पक्षाच्या नेत्यांच्या तुलनेत उशिराने दाखल झाले. त्याआधी केजरीवालांचे पोस्टर हटवण्यात आले होते. त्यामुळे या पोस्टरला काँग्रेसचा विरोध असल्याच्या चर्चेने जोर धरला. (India Alliance Rally)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, रॅलीमध्ये बोलताना राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले, ‘भाजपला निष्पक्ष निवडणूक होऊ द्यायची नाही. त्यामुळेच निवडणुकीच्या आधी काँग्रेसची बँक खाती गोठवली. दोन राज्यातील मुख्यमंत्र्यांना अटक केले. निवडणुकीच्या तोंडावर कारवाई करून भाजप मॅचफिक्सिंग करत आहे.’ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांची अटक हा संविधानावर हल्ला आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल (Sunita Kejriwal) यांनी भाषणादरम्यान अरविंद केजरीवाल यांची सहा आश्वासने वाचून दाखवली. देशात कोणत्याही भागात वीजकपात केली जाणार नाही, देशातील सर्व गरिबांना मोफत वीज, प्रत्येक गावात सुसज्ज शाळा, दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकप्रमाणे देशातील प्रत्येक गावात असे क्लिनिक, प्रत्येक जिल्ह्यात सरकारी मल्टीस्पेशालिटी रुग्णालय, स्वामीनाथन रिपोर्टनुसार शेतमालाला किमान आधारभूत किंमत आणि दिल्लीला स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला जाईल, अशा सहा गॅरंजी यावेळी केजरीवालांनी दिल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT