AAP Leaders Sarkarnama
देश

Satyendar Jain : केजरीवालांसाठी मोठी बातमी; विश्वासू नेता तब्बल 873 दिवसांनी येणार तुरुंगातून बाहेर

Rajanand More

New Delhi : आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यासाठी मोठी बातमी आहे. त्यांचे विश्वासू नेते व दिल्ली सरकारमधील माजी मंत्री सत्येंद्र जैन तब्बल 873 दिवसांनंतर जेलमधून बाहेर येणार आहे. मनी लाँर्डिंग प्रकरणात दिल्लीतील विशेष न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.

सत्येंद्र जैन यांना ईडीने 30 मे 2022 रोजी मनी लॉर्डिंग प्रकरणात अटक केली होती. आज त्यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. जैन हे जवळपास 873 दिवस तुरुंगात राहिले आहेत. त्यामुळे त्यांना जामीन मिळायला हवा, असे कोर्टाने म्हटले आहे.

ईडीने जैन यांच्या जामीनाला विरोध केला होता. पण जैन यांच्या वकिलांनी मनिष सिसोदिया यांना जामीन देताना सुप्रीम कोर्टाने नोंदवलेल्या निरीक्षणांचा आधार घेत बाजू मांडली. कोर्टाने सिसोदिया यांच्या केजरीवालांना जामीन देताना जेलमध्ये त्यांच्या मुलभूत अधिकाऱ्यांचे उल्लंघन होत असल्याचे म्हटले होते.

दरम्यान, जैन यांच्याशी संबंधित चार कंपन्यांच्या संबंधित मनी लॉन्ड्रींग प्रकरणात ईडीने त्यांना अटक केली होती. त्यांनी जामीनासाठी अनेकदा प्रयत्न केले. अखेर आज त्यांना दिलासा मिळाला. ते आप सरकारमध्ये आरोग्य मंत्री होती.

जैन यांना जामीन मंजूर झाल्यानंतर आपने सत्यमेव जयते म्हणत आनंद व्यक्त केला आहे. आपने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मोहल्ला क्लिनिक बनवून दिल्लीत आरोग्य क्रांती घडवून आणणाऱ्या सत्येंद्र जैन यांना कोर्टाने जामीन मंजूर केल्याने भाजपचे आणखी एक षडयंत्र फसले आहे. आज पुन्हा एकादा भाजपचा खरा चेहरा संपूर्ण देशासमोर उघडा पडल्याची टीका आपने केली आहे.

जैन यांच्याआधी मागील काही महिन्यांत संजय सिंह, मनीष सिसोदिया आणि अरविंद केजरीवाल जेलमधून बाहेर आले आहेत. या तिघांना दिल्ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी ईडीने अटक केली होती. आता जैनही बाहेर आल्याने आपची ताकद वाढली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT