Rahul Gandhi, CBI Sarkarnama
देश

Rahul Gandhi : राहुल गांधींच्या अडचणी वाढणार, CBI चौकशी सुरू; दिल्ली हायकोर्टात काय घडलं?

Citizenship CBI Delhi High Court : भाजप नेते विग्नेश शिशीर यांनी राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका अलाहाबाद हायकोर्टात दाखल केली आहे.

Rajanand More

New Delhi : काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्या नागरिकत्वाविषयी सीबीआयने चौकशी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली हायकोर्टाला बुधवारी याबाबत माहिती देण्यात आली.

भाजप नेते विग्नेश शिशीर यांनी सीबीआय चौकशीबाबत दिल्ली हायकोर्टाला माहिती दिली आहे. विग्नेश यांनी अलाहाबाद हायकोर्टात राहुल गांधींच्या नागरिकत्वाबाबत जनहित याचिका दाखल केली आहे. त्याअनुषंगाने सीबीआयने तपास सुरू केल्याचे शिशीर यांनी बुधवारी दिल्ली हायकोर्टाला सांगितले.

हायकोर्टाचे मुख्य नायमूर्ती मनमोहन आणि न्यायमूर्ती तुषार राव गेडेला यांच्या खंडपीठासमोर बुधवारी भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी स्वामी यांनीही राहुल गांधींच्या नागरिकत्वावर आक्षेप घेत गृह मंत्रालयाकडून याबाबत माहिती घेण्याची विनंती कोर्टाला केली.

शिशीर हेही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणीला हजर होते. त्यांनी कोर्टात सांगितले की, मी दाखल केलेल्या प्रकरणात सीबीआयपुढे हजर झालो होतो. याप्रकरणी खूप गोपनीय पुरावे सादर केले आहेत. या प्रकरणाची सध्या सीबीआय चौकशी करत आहे. अलाहाबाद हायकोर्टातील सुनावणी बरीच पुढे गेली आहे.

दरम्यान, स्वामी यांनी 2019 मध्ये केंद्र सरकारला पत्र लिहून राहुल गांधी यांच्याकडून नियमांचे उल्लंघन झाल्याची तक्रार केली होती. ते ब्रिटीश नागरिक असल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्यामुळे त्यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करावे, अशी मागणी स्वामी यांनी केली होती.

मे 2019 मध्ये सुप्रीम कोर्टात राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाविषयी याचिका दाखल करण्यात आली होती. दुहेरी नागरिकत्वामुळे त्यांना लोकसभा निवडणूक लढवण्यास मज्जाव करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. मात्र, कोर्टान ही याचिका फेटाळून लावली होती.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT