Raghav Chadha, Durgesh Pathak, Saurabh Bhardwaj, Atishi Sarkarnama
देश

Delhi Liquor Scam News : ‘आप’च्या आणखी चार नेत्यांना अटक होणार; मंत्र्यांनीच सांगितली नावे

Arvind Kejriwal News : अरविंद केजरीवाल यांनी चौकशीदरम्यान दोन मंत्र्यांची नावे घेतल्याचा दावा ईडीने काल कोर्टात केला. त्यानंतर आज आतिशी यांनी आपल्याला अटक होणार असल्याचे सांगितले.

Rajanand More

New Delhi : दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळा (Delhi Liquor Scam News) ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चांगला गाजत आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि खासदार संजय सिंह या प्रकरणात तुरुंगात आहेत. आता आम आदमी पक्षाच्या आणखी चार नेत्यांना अटक होणार असल्याचा मोठा दावा खुद्द केजरीवाल सरकारमधील मंत्र्यांनी केला आहे. तसेच भाजपकडून पक्षात प्रवेश करण्याची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे.

मंत्री आतिशी (Atishi) यांनी मंगळवारी मीडियाशी बोलताना भाजपवर (BJP) निशाणा साधला. कालच केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी चौकशीदरम्यान आतिशींसह सौरभ भारद्वाज (Saurabh Bharadwaj) यांचे नाव घेतल्याचा दावा ईडीने (ED) न्यायालयात केला आहे. त्यानंतर आज आतिशी यांनी लगेच मीडियाशी संवाद साधत आपच्या नेत्यांना राजकारणातून संपवण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप केला.

लोकसभा निवडणुकीदरम्यान (Lok Sabha Election 2024) पुढील दोन महिन्यांत आपच्या (AAP) आणखी चार नेत्यांना अटक करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप करत आतिशी म्हणाल्या, माझ्यासह सौरभ भारद्वाज, दुर्गेश पाठक आणि खासदार राघव चड्ढा यांनाही अटक करतील. आम्हा सगळ्यांना तुरुंगात टाकण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पुढील काही दिवसांत आमच्या घरी ईडीची रेड पडेल. माझे कुटुंब, नातेवाइकांच्या घरावरही रेड पडेल. समन्स पाठवले जाई आणि अटक करतील.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जाणीवपूर्वक घेतले नाव

ईडीने काल कोर्टात आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांच्या सहभागाचा दावा केल्याबाबत आतिशी म्हणाल्या, ईडी आणि सीबीआयकडे दीड वर्षापासून असलेल्या जबाबाच्या आधारे आमचे नाव काल कोर्टात घेण्यात आले. हा जबाब सीबीआयच्या आरोपपत्रातही आहे. मग आत्ताच आमची नावे कोर्टात घेण्याचा उद्देश काय होता, असा सवाल आतिशी यांनी उपस्थित केला.

केजरीवाल पहिले मुख्यमंत्री

एखाद्या घोटाळ्याच्या प्रकरणात आरोपी म्हणून तुरुंगात जाणारे अरविंद केजरीवाल पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. मुख्यमंत्रिपदावर असलेल्या नेत्याला पहिल्यांदाच अटक करण्यात आली आहे. त्यांना २१ मार्चला अटक करण्यात आले आहे. दुसऱ्या दिवशी कोर्टाने त्यांना 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. त्यानंतर पुन्हा एक एप्रिलपर्यंत ईडी कोठडीत पाठवण्यात आले, तर सोमवारी त्यांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, त्यांची रवानगी तिहार जेलमध्ये करण्यात आली आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT